सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांचे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी पाचोरा शहरात आगमन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२३
पाचोरा तालुक्यातील नामांकित सहकारी शिक्षण संस्थेचा वटवृक्ष होण्यासाठी स्व. तात्यासो. द. मु. परांजपे, स्व. भाईसो. बाबुभाई रावल, स्व. माजी आमदार स्वा. आण्णासो. सु. भा. पाटील, स्व. माजी आमदार बापुसो. के. एम. पाटील, स्व. माजी आमदार आप्पासो. ओं. ना. वाघ, स्व. स्वा. दादासो. आर. एस. थेपडे, स्व. भैय्यासो. अॅड. वाय. बी. शर्मा, स्व. आण्णासो. अॅड. एस. आर. देशमुख या दिवंगत पदाधिकार्यांनी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याचे श्रेय जाते ते सर्वार्थाने शिक्षणासाठी समर्पित दिवंगत पदाधिकार्यांना.
शिक्षणासाठी आयुष्य वेचणार्या या विभुतींच्या स्मृती जपण्याचा वारसा पाचोरा तालुक्यातील नामांकित सहकारी शिक्षण संस्थेचा सतत प्रयत्न संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो. दिलीप भाऊ वाघ, संस्थेचे चेअरमन नानासो. संजय नाना वाघ, व्हाईस चेअरमन नानासो. व्ही. टी. जोशी, मानद सचिव अॅड. दादासो. महेश देशमुख यांच्यासह सर्व संचालक आणि पदाधिकार्यांनी जोपासत वाटचाल सुरू केली आहे.
चमकोगिरी व तामझामच्या प्रसिध्दीच्या मोहाच्या दुनियेत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या विद्यमान मान्यवर पदाधिकार्यांनी मात्र फिल्म दुनियेतील प्रसिध्द अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांना दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ गुरूवार रोजी सायंकाळी साडेसात वाजता पाचोरा शहरातील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा जि. जळगाव येथे एक दिवसीय व्याख्यानोत्सवासाठी आमंत्रित केले आहे.
विशेष बाब म्हणजे डॉ. निशीगंधा वाड यांच्या नावापुढे डॉ. शब्द वाचल्यानंतर सहज त्यांनी वैद्यकिय क्षेत्रातील पदवी घेतली असावी असे वाटते. परंतु त्यांच्या जिवनपटावर थोडासा प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला असता डॉ. निशीगंधा वाड यांनी फक्त सिनेसृष्टीतच आपले नाव लौकिक केले नाही तर अगदी शालेय जिवनापासूनच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखिल आपले नाव लौकिक केल्याचे दिसून येते. थोडक्यात सांगायचे झाले तर डॉ. विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई. त्यांचा जन्म दिनांक ११ ऑक्टोबर १९६९ रोजी झाला. निशीगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. निशीगंधा वाड या १९८५ मध्ये झालेल्या १० वीच्या परीक्षेत पहिल्या पन्नासात आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसर्या क्रमांकावर आल्या होत्या.
१९९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक काळाच्या बंधनास न जुमानणारं लावण्य, सौंदर्य खचितच ज्या व्यक्तिंवर मेहरनजर करत, त्यांपैकी एक म्हणजे निशीगंधाजी. सन १९९० च्या सुमारास व्यावसायिक चित्रपटांमध्ये त्यांचे पदार्पण झाले. भारतीय आणि ब्रिटीश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या विषयावर पी. एच. डी. च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला. सन २००३ मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना पी. एच. डी. बहाल केली.
नंतर निशीगंधा वाड यांना कोलंबिया विद्यापीठाने डी. लिट. पदवी दिली आहे. निशीगंधा वाड एक सालस, चिकित्सक, अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांनी काही मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर शंभरहूनही अधिक चित्रपट त्यांच्या नावे आले. शेजारी-शेजारी, वाजवा रे वाजवा, एकापेक्षा एक, प्रतिकार, सासर माहेर, अशी ही ज्ञानेश्वरी यांसारखे मराठी तसेच सलिम लंगडे पे मत रो, कर्म योद्धा, दादागिरी, आप मुझे अच्छे लगने लगे यांसारखे हिंदी चित्रपट त्यांनी केले. कुलवधू (मराठी) व झी हॉरर शो (हिंदी) यांसारख्या मालकाहि त्यांनी केल्या.
अभिनयासोबतच एक उत्तम लेखिका म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी लिहिलेल्या पाच पुस्तकांपैकी तीन पुस्तकांना राज्य शासनाचा मानाचा पुरस्कार मिळाला. मराठी व ब्रिटीश रंगभूमी व चित्रसृष्टीतील दृष्टीकोनातून स्त्रियांची समाजातील बदलती भूमिका या विषयावर मुंबई विद्यापीठात त्यांनी केलेले संशोधन त्यांच्या विद्वत्तेचीही ग्वाही देते. रिलीजीयस हार्मनी फाऊंडेशन निर्मित धार्मिक सलोखा या विषयावरील व्याख्यापटाच्या त्या व्याख्यात्या आहेत. अश्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे पाचोरा येथील श्री. एम. एम. महाविद्यालयाच्या पुण्यभुमीवर आगमन होत आहे.
त्यांचे सत्यजित न्यूज न्यूज परिवारातर्फे मन:पूर्वक स्वागत. तसेच सर्व पंचक्रोशीतील माता-पिता-बंधु-भगिनींनी डॉ.निशीगंधा वाड यांच्या एकदिवसीय व्याख्यानोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाची वेळ व दिनांक आहे ०२ फेब्रुवारी २०२३ गुरूवारी सायंकाळी ठिक सात वाजता ठिकाण वा. श्री. सेठ एम. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात पाचोरा.