अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालामुळे कापूस बाजारभावात मोठी घसरण भविष्यात कसा राहील भाव? काय म्हणताय तज्ज्ञ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनां~१६/०१/२०२३
एकाबाजूला शेतकरी कापसाचा भाव वाढले या अपेक्षेने आपला कापूस घरात बाळगून आहे. तर दुसरीकडे अमेरिकन कृषी विभागाने कापसाच्या उत्पादनाबाबत नुकताच एक सुधारित अहवाल सार्वजनिक केला आहे. या अहवालात कापसाच्या अंतिम साठ्याबाबत भाकीत वर्तवण्यात आल आहे. युएसच्या कृषी विभागाने नवीन कापूस उत्पादन, कापूस वापर, साठा याबाबतचा सविस्तर अहवाल सार्वजनिक केला असून यामुळे जागतिक बाजारात दरात पडझड पाहायला मिळत आहे. यामुळे कापसाला चांगला भाव मिळेल या आशेवर जगत असलेल्या शेतकऱ्यांचा स्वप्नांचा चुराडा होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
खरं पाहता, अमेरिकन कृषी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आपल्या नव्या अहवालात जगात कापसाचा अखेरचा साठा (एण्डिंग स्टॉक) ७० लाख गाठींनी अधिक राहील असं भाकीत वर्तवलं असल्याने कापूस बाजार अजूनच सावध झाला आहे.
अमेरिकेच्या या अंदाजामुळे बाजारात काहीशी पडझड झाली असून कापूस उत्पादकांची डोकेदुखी वाढत आहे. याशिवाय या अंदाजात भारतातील कापूस उत्पादनाबाबत देखील माहिती आहे. अमेरिकन कृषी विभागाच्या मते यंदा भारतात कापसाचे उत्पादन सुमारे ३४० लाख गाठी एवढे राहणार आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी देखील नुकताच सार्वजनिक केलेल्या आपल्या एका अहवालात देशातील कापूस उत्पादन ३३९ लाख गाठी एवढे राहील असं नमूद केल आहे.
मात्र यावर काही जाणकार लोकांनी आक्षेप नोंदवला असून अतिवृष्टी, गुलाबी बोंड अळी, लाल्या रोग यामुळे कापसाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला असून कापूस उत्पादनात मोठी घट होईल असं सांगितले आहे. जाणकार लोकांच्या मते यंदा देशांतर्गत केवळ ३०० लाख कापूस गाठी उत्पादन होणार आहे. निश्चितच आता उत्पादनाचा कोणाचा आकडा खरा ठरतो याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान आता अमेरिकेच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या या आपल्या अंदाजामुळे जगात कापूससाठा वाढेल, अशी आशंका बाळगून बाजार सावध झाला आहे. या अंदाजामुळे वापर कमी होईल असं चित्र असल्याने सध्या बाजारात नरमाई आली आहे.
अमेरिका, ब्राझील, भारत आदी देशांमधील कापूस निर्यातही मागील हंगामाच्या तुलनेत कमी झाल्याचे त्यात म्हटले आहे. निश्चितच देशातून होणारी निर्यात यावर्षी कमी असल्याचे चित्र आहे. एकंदरीत अमेरिकन कृषी विभागाच्या या नवीन अंदाजामुळे कापूस बाजार सावध झाला असून दरात पडझड सुरू झाले आहे. एवढंच नाही तर कापूस दरात घसरण होण्यामागे चीनमधील अस्थिर स्थिती, युरोपातील मंदी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) नकारात्मक घडामोडी, रशिया युक्रेन युद्ध या जागतिक घटना देखील कुठे ना कुठे कारणीभूत असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.
निश्चितच या वैश्विक पटलावर घडलेल्या घटना देशांतर्गत दरात घट घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरल्या असल्याने भारतीय कापूस उत्पादक यंदा कमालीचा संकटाचा पल्ला आहे. दरम्यान चीनमध्ये लवकरच नवीन वर्षाची धामधूम सुरू होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की चीनमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर २० ते २५ दिवस सर्व उद्योग बंद राहण्याची शक्यता आहे. नेहमी जवळपास एक महिना चीनमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी उद्योग बंद असतात.
चीनमध्ये नवंवर्षाच्या पर्वामुळे देखील कुठे ना कुठे बाजारावर विपरीत परिणाम होत आहे. निश्चितच जागतिक पातळीवर घडणाऱ्या या घटना भावात घसरण घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. आता भविष्यात दर वाढतात की नाही हे सर्वस्वी कापूस उत्पादनावर डिपेंड राहणार आहे. सद्यस्थितीला देशांतर्गत ८०००/०० रुपये प्रति क्विंटल ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर कापसाला नमूद केला जात आहे.