तब्बल पन्नास वर्षांनंतर सामनेर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०५/२०२२
राजकारण असो की समाजकारण यात वावरतांना साम, दाम, दंड, भेद हे वापरले जातात. परंतु साम वगळल्यास दाम, दंड, भेद हे पर्याय अमलात आले म्हणजे सुरु होतो तो संघर्ष व याच संघर्षातून गावागावांतील, समाजातील जनमानसात समाज, गैरसमज होऊन एकमेकांमध्ये दुरावा वाढतो, संघर्षमय परिस्थितीत निर्माण होते. सामाजिक नुकसान होते. अनाठायी पैसा खर्च केला जातो. एखाद्यावेळी हमरीतुमरीवर विषय येतो. असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत दिसून येते आहे.
जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुका लागल्या पासून आजपर्यंत बऱ्याचशा सोसायटीच्या निवडणुका पार पडल्या आहेत तर काही सोसायटीच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. या निवडणुकीत बोटावर मोजण्याइतक्या काही सोसायटी वगळल्यास सगळीकडे पैशांचा पाऊस पडतांना दिसून येत आहे. सोबतच रंगीत पार्ट्या दिल्या जात आहेत. मतदान आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी एक, एक मतदात्याला दोन हजार रुपयांपासून तर काळवेळ पाहून पाच हजार रुपयांहून अधिक पैशांचे वाटप करण्यात येत असल्याचेही प्रकार गावागावांतील सोसायटीच्या निवडणूकीत दिसून येत आहेत.
परंतु दाम, दंड, भेद या सगळ्या गैरप्रकारांना सोडचिठ्ठी देत सामनेर गावाच्या नावाप्रमाणे गावाच्या नावातील (साम) या शब्दाला महत्व देत साम शब्दांच्या अर्थाप्रमाणे समजून सांगत व समजून घेत एकोप्याने सर्वानुमते सामनेर गावातील शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची २०२२ ते २०२७ या कार्यकाळासाठीची निवडणूक तब्बल पन्नास वर्षांनंतर बिनविरोध करुन जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी स्थापन झाल्यापासून सुरुवातीचा काळ जर सोडला तर मागच्या काळातील पंचवार्षिक निवडणुकीत दोन पॅनलमध्ये सरळ लढती झाल्या लढत आली म्हणजे प्रचार आलाच व याच प्रचाराच्या रणधुमाळीत आपापल्या पॅनलला मते जास्त कशी मिळतील म्हणून प्रयत्न करत असतांनाच ओघा, ओघात मतभेद होत होते व यातुनच गावात काही काळासाठी कटूता निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन सोसायटीच्या सर्व सभासदांनी व सुज्ञ नागरिकांनी यावर्षीची निवडणुकीत बिनविरोध करण्यासाठी एकत्र बसून विचार, विनिमय करुन सोसायटीची निवडणूक बिनविरोध करुन होणाऱ्या खर्चाला आडफाट देत गावातील श्री. विठ्ठल रुखमाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवण्यात आल्यानंतर सोसायटीच्या सर्व सभासदांनी एकत्र येत गावातील जेष्ठ, श्रेष्ठ व सुज्ञ नागरीकांच्या उपस्थितीत सर्वानुमते ठरवून संचालक मंडळाची निवड केली या निवडीत
सर्वसाधारण गटामधून
बाळकृष्ण जगन्नाथ पाटील, माणिकराव माधवराव पाटील, विजय शंकर पाटील ,साहेबराव शिवाजी पाटील ,पंढरीनाथ भिका पाटील, सुनील हरी पाटील, लीना सुधीर वाणी मयूर रवींद्र पाटील. रविंद्र तापीराम पाटील.
महिला राखीव
रेखाबाई गोरखनाथ नेरपगार, शारदाबाई एकनाथ पाटील.
विजा.भ.ज.व.विमाप्र
आण्णा सावळाराम पवार
अनुसुचित जाती जमाती-
दगा चिंधु भिल्ल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हा.भ.प. योगीराज पाटील, प्रा. राजेंद्र साळुंखे, महेंद्र साळुंखे, मनोज साळुंखे, प्रमोद पाटील, अशोक पाटील, नाना नेरपगार, भालचंद्र चव्हाण, रविंद्र साळुंखे, किशोर पाटील, भागवत पाटील, दत्तात्रय बडगुजर, अभिमान पाटील, विकास वाणी, राजेंद्र पाटील, सुनील गोसावी, चंद्रकांत चव्हाण, सुकलाल पाटील, यांनी अथक परिश्रम घेतले.
(माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाचे अभिनंदन केले) व सामनेर गावाचा आदर्श जिल्ह्यातील इतर गावातील सोसायटीच्या सभासदांनी घेऊन जास्तीत जास्त सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात असे आवाहन केले.