उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग. मतदार यादीत नाव नसतांनाही उमेदवारीचे डोहाळे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०२/२०२२
पाचोरा तालुक्यात पंचायत समिती व जिल्हापरिषद निवडणूकीचे वारे वाहू लागले असून नवीन रचना व मांडणी नुसार गण, गट जाहीर करण्यात आले आहेत. या गण, गटांच्या बांधणीत आधीच्या रचनेत बदल करण्यात आला असून इकडची गाव तिकडे, तिकडची गाव इकडे झाली असल्याने राजकीय वर्तुळात कही खुशी, कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच पंचायत समित व जिल्हापरिषदेच्या निवडणूकीत आपापल्या पक्षाची मोर्चे बांधणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु झाल्या आहेत. याकरिता योग्य ठिकाणी योग उमेदवार उभा करण्यासाठी गण, गटातील जातीनिहाय आकडेवारी डोळ्यासमोर ठेवून उमेदवारांची चाचपणी सुरु असून कोणत्या गण व गटासाठी कशी उमेदवारी जाहीर होते पैकी किती जागा आरक्षणानुसार निघतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
याच गडबडीत पाचोरा तालुक्यातील कधी तळ्यात कधी मळ्यात असा खेळ खेळणारा एक नवखा उमेदवार नवीन पक्षाच्या छत्रछायेखाली हातपाय पसरवण्यासाठी धडपडत असून कधी खेळाचे सामने, कधी सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तर कधी आरोग्य शिबिर घेऊन आपल्या परिसरात जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. संबंधित नवख्या व इच्छुक उमेदवाराबद्दल अधिक माहिती जाणून घेतली असता एका बाजूला निवडणूक लढण्यासाठी उमेदवारीची तयारी सुरू असतांंना दुसरीकडे मात्र मतदार यादीत नाव नसल्याचे उघड झाले आहे. म्हणून जाणकार लोकांमध्ये याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली असून उतावळा नवरा, आणि गुडघ्याला बाशिंग तसेच मतदार यादीत नाव नसतांंना निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची स्वप्न पाहणे म्हणजे अंधा बोले क्या होता, बहिरा बोले ब्याह होता अशा पद्धतीत टर उडवली जात आहे.