गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे, विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०३/२०२४
पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक ०१ मार्च २०२४ शुक्रवार रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित एकुण ३८८ प्रकल्प बनवून इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतून माहिती सादर केली. बनवलेले प्रकल्प व विद्यार्थीनी दिलेली माहिती ऐकून पालकवर्ग मंत्रमुग्ध झाले होते.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पाचोरा पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी मा. श्री. समाधान पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, फित कापून करण्यात आले तसेच रॉकेटच्या प्रतिकृतीचे संचालन करुन करण्यात आले. तदनंतर पाचोरा पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी मा. श्री. समाधान पाटील यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक युगात विज्ञानाचे महत्व पटवून देत शास्त्रीय दृष्टिकोन वृद्धींगत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विज्ञानाचे प्राध्यापक व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक मा. श्री. राजेंद्र चिंचोले सरांनी विज्ञानावर आधारित विविध प्रश्न विचारुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. तसेच मा. श्री. हरिभाऊ पाटील, डॉ. मनिष दादा चंदनाणी यांनी विज्ञान प्रदर्शनात लहान मुलांनी बनवलेले विविध प्रयोग व उपकरणे पाहून त्यांचे कौतुक केले.
या विज्ञान प्रदर्शनात अंबे वडगाव येथील सौ. सुरेखा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना अलाहित व विज्ञान विषयाच्या जेष्ठ शिक्षिका सौ. डॉ. अमेना बोहरा यांनी तर आभारप्रदर्शन शाळेचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य मा. श्री. प्रेम शामदाणी सरांनी केले. या विज्ञान प्रदर्शनात उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध प्रोजेक्ट व विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून लेखी स्वरूपात आपला अभिप्राय नोंदवून संस्थेच संस्थापक अध्यक्ष, शिक्षकवृंद याचे मनापासून आभार मानले.