नायलॉन मांजा उत्पादन, साठवणूक, विक्री व मांजा बाळगणे याविरोधात कृतिदल स्थापन करण्यासाठी पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०१/२०२३
आपल्याकडे मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त पंतंग उडवण्याची प्रथा आहे. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून मनमुराद आनंद लुटला जातो. परंतु हे करत असतांनाच पतंग उडवण्यासाठी पक्षी, पशु व मानवाच्या जीविताला घातक असलेला चायनीज नायलॉन मांजा वापरला जात असल्याने पक्षी, पशु व मानव जखमी होतात यात पक्ष्यांच्या मानेला, पंखांना तसेच पशुंच्या व मानवाच्या विविध अवयवांवर या मांजाचा स्पर्श झाला तर त्याठिकाणीची त्वचा कापली जाते, डोळ्याला इजा होऊन डोळा निकामी होणे, एवढेच नाही तर काही ठिकाणी मानेच्या जवळ असलेल्या रक्तवाहिन्या कापल्या गेल्याने काहींना जीव गमवावे लागले आहेत. तसेच हजारो पाखरांचे बळी गेले आहेत. असे असले तरी या नायलॉन मांजाची खुल्या बाजारात राजरोसपणे विक्री सुरू असल्याचे असे दिसून येते आहे.
विशेष म्हणजे नायलॉन मांजाची बाजारात राजरोसपणे सुरु असलेली विक्री थांबण्यासाठी दरवर्षी फक्त जी. आर. काढला जातो परंतु थेट कारवाई होत नसल्याने या वर्षीच्या मकरसंक्रांतीच्या अगोदर शहरी व ग्रामीण भागातील पोलिस विभाग, वनविभाग, महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कृतीदल स्थापन करण्यात येऊन ज्या, ज्या ठिकाणी चायनीज नायलॉन मांजाची निर्मिती, साठवणूक, विक्री किंवा पतंग उडवण्यासाठी वापर होतांना दिसून आल्यास त्यांच्यावर जागेवरच कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निसर्गमित्र जळगाव तर्फे पक्षीमित्र सौ. शिल्पा गाडगीळ व मा. श्री. राजेंद्र गाडगीळ यांनी माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून मा. जिल्हाधिकारी यांनी याबाबत त्वरित कृतीदल स्थापन करुन संबंधितांना तश्या सुचना देऊन त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.