अंबे वडगाव गावाजवळील रस्त्याचे डांबरीकरणाबाबत ग्रामपंचायतीचा आक्षेप, चौकशीची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०५/२०२२
पाचोरा ते जामनेर महामार्गावर नुतनीकरणाचे काम सुरू आहे. हे नुतनीकरणाचे काम करतांना अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रम ते अंबे वडगाव बसस्थानक परिसरात डांबरीकरणाचे (नुतनीकरण) काम सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदार हा मनमानीपणे काम करत असून या परिसरात करण्यात आलेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार गृप ग्रामपंचायत अंबे वडगावचे सरपंच यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाचोरा यांच्याकडे लेखी स्वरूपात दिली असून या तकारी अर्जाच्या प्रती अधिक माहिती साठी व रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदाराकडून चांगले काम होण्यासाठी पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, मा. प्रांताधिकारी पाचोरा व मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्याकडे पाठवल्या आहेत.
या तकारी बाबत सविस्तर माहिती अशी की पाचोरा ते जामनेर महामार्गाचे नुतनीकरण करण्यात येत असून हे नुतनीकरण करतांना अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रम ते अंबे वडगाव बसस्थानक परिसरात डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र हे नुतनीकरणाचे डांबरीकरण करतांना रस्त्यावर खडीकरण व मजबुतीकरण करणे हे अंदाज पत्रकात प्रस्तावित केलेले आहे. कारण अतिवृष्टीमुळे या रस्त्यावरील डांबरीकरण संपूर्ण वाहून गेलेले आहे. म्हणून रस्त्याचे नुतनीकरण करतांना खडीकरण व मजबुतीकरण करणे अत्यंत गरजेचे व अत्यावश्यक असल्यावर ही संबंधित शितल कंट्रक्शन कडून या नियमांची पायमल्ली करत रस्त्यावरील खड्ड्यातील मातीची साफसफाई न करता केवळ थेट डांबराचे अतिशय कमी प्रमाणात मिश्रण टाकून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
तसेच सदरील रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम त्वरित थांबवण्यात येऊन अंदाजपत्रकात नमुद केलेल्या सर्व अटी, शर्ती नुसार खडीकरण, मजबुतीकरण करुन नंतर चांगल्या प्रकारे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून सदरील रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करण्यासाठी भाग पाडू नये असा इशारा दिला आहे.