पाचोरा शहर तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन : प्रशासन सज्ज.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०३/२०२१
पाचोरा भडगाव या दोन्ही शहरातील covid-19 बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रांताधिकारी राजेंद्र कचरे साहेब यांनी तारीख १९, २० व २१ मार्च या तीन दिवसात पाचोरा व भडगाव शहरात शंभर टक्के लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्याचे आदेश दिलेले आहेत.
या पार्श्वभूमीवर पाचोरा प्रशासन सज्ज झाले असून आज ता. १८ मार्च मध्यरात्री बारा वाजेपासून पाचोरा शहर हद्दीत चोख बंदोबस्त वाढवण्यात आला आहे . लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी संपूर्ण पाचोरा शहरात पोलिस बंदोबस्ताची आखणी केलेली आहे.
असे आहेत फिक्स पॉईंट
लॉकडाउन बंदोबस्ताच्या आखणीत पाचोरा शहरात
१) छत्रपती शिवाजी महाराज चौक,
२) छत्रपती संभाजी महाराज चौक,
३) आठवडे बाजार चौक
४) जारगाव चौफुली म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब चौक,आणि
५)भारत डेअरी बस स्टॉप चौक
या पाचही ठिकाणी कायमस्वरूपी (फिक्स पॉईंट) बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
संपूर्ण पाचोरा शहरात ०१ पोलीस निरीक्षक व ०६ अधिकारी आणि २९ पोलीस कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आलेले आहेत. महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिसांचे स्वतंत्र पथक गस्तीवर राहणार आहे. याशिवाय पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे यांच्या नेतृत्वाखाली ४ पोलीस कर्मचारी असलेले पोलिसांचे फिरते पथक शहरात गस्ती ला राहणार आहे.
पाचोरा उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांतअधिकारी व तहसीलदार पाचोरा यांचे पाच नोडल अधिकारी स्वतंत्र ०५ पथकासह लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. त्यांचे समवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे , पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील इत्यादी पोलीस अधिकारी व पोलिसांचा फौजफाटा यांचे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे.
तसेच पाचोरा नगरपालिका तर्फे कर निरीक्षक साईदास जाधव यांच्या नेतृत्वाखाली लिपिक भागवत पाटील व चार सेवक असे एकूण सहा जणांचे फिरते पथक पाचोरा शहरातील लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सज्ज आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
प्रशासनाच्या आदेशानुसार पाचोरा शहर हद्दीत तीन दिवस लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. नियमांचे पालन करावे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, व कर्मचारी, मेडिकल स्टोअर्स व अत्यावश्यक सेवा कर्मचारी, शासकीय कर्मचारी व रुग्णांनी अत्यावश्यक कागदपत्रे आणि ओळखपत्रे सोबत ठेवावीत. लॉकडावून यशस्वी करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केलेले आहे.
पाचोरा उपविभागातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील ३ दिवस निर्बंध लादले आहेत. आज पर्यंत नागरिकांनी प्रशासनाला नेहमीच सहकार्य केले आहे. यापुढेही याच सहकार्याची अपेक्षा करतो. आपले शहर ही आपलीच जबाबदारी आहे.
राजेंद्र कचरे
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
उपविभागीय दंडाधिकारी, पाचोरा.