क्षमतादेखील ओलांडलेली एस.टी; अपुऱ्या सुविधांमुळे अपघातांची साखळी, प्रवाशांचा जीव कायम धोक्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१२/२०२५
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एस.टी.) सेवा सध्या गंभीर अवस्थेत आहे. एकीकडे वर्षानुवर्षे जुनी, मोडकळीस आलेली वाहने; तर दुसरीकडे क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात प्रवासी वाहतूक—या दुहेरी संकटामुळे एस.टी.चा प्रवास दिवसेंदिवस अपघातप्रवण व जीवघेणा ठरत आहे.
राज्यभर ग्रामीण, शहरी आणि दुर्गम भागात धावणाऱ्या बहुतांश बसेसमध्ये मूलभूत सुरक्षासुविधांचा अभाव दिसून येतो. अनेक बसगाड्यांमध्ये फायर फायटर, प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था, तसेच पंक्चरच्या वेळी उपयोगी येणारे अतिरिक्त चाक (स्टेपनी), पाना-टामी आदी साधनसामग्री नसते. परिणामी तांत्रिक बिघाड झाल्यास चालक व प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होते आणि अपघाताचा धोका वाढतो.
या धोकादायक परिस्थितीत भर म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक. गर्दीच्या वेळेत, सण-उत्सव, शालेय व महाविद्यालयीन सत्र, बाजाराचे दिवस अशा वेळी अनेक बसगाड्या अक्षरशः प्रवाशांनी कोंबलेल्या अवस्थेत धावताना दिसतात. आसनक्षमता ५० असलेल्या बसमध्ये ७० ते ८० प्रवासी कोंबले जात असल्याने बसचा समतोल बिघडतो. उभ्या प्रवाशांमुळे आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडणे अशक्य होत असून किरकोळ ब्रेक लागला तरी प्रवासी एकमेकांवर कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
याचा थेट परिणाम अपघातांच्या वाढत्या प्रमाणावर होत आहे. ओव्हरलोड वाहतूक, झिजलेले ब्रेक, खराब टायर, नादुरुस्त सस्पेन्शन आणि तुटलेली आसनव्यवस्था यामुळे वाहनावर चालकाचे नियंत्रण कमी होते. अनेकवेळा एसटी बस पलटी होणे, रस्त्याबाहेर घसरणे, समोरासमोरच्या वाहनांवर आदळणे अशा दुर्घटना घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या अपघातांमध्ये सर्वाधिक बळी ग्रामीण व गरिब प्रवाशांचे जात असल्याचे चित्र चिंताजनक आहे.
याशिवाय वेळेवर बस न मिळाल्याने प्रवाशांची गर्दी वाढते आणि चालकांवरही वेळापत्रक पाळण्याचा ताण येतो. या तणावात वेग वाढविणे, सततच्या फेऱ्या, कमी विश्रांती—यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढतो. दुसरीकडे, फाटलेली आसनव्यवस्था, तुटलेले पत्रे, बसमधील खडखडाट यामुळे प्रवास असह्य बनला आहे.
या सर्व प्रकारांमुळे “प्रवाशांची सुरक्षितता प्रथम” हा एसटी महामंडळाचा मूलमंत्र केवळ कागदावरच राहिल्याची भावना निर्माण झाली आहे. अपघात रोखण्यासाठी बसेसचे ओव्हरलोडिंग थांबवणे, प्रवाशांच्या क्षमतेनुसारच वाहतूक करणे, जुन्या व धोकादायक बस तातडीने रस्त्यावरून हटवणे आणि नियमित तांत्रिक तपासणी सक्तीची करणे, अशी जोरदार मागणी विविध प्रवासी संघटनांकडून होत आहे.
अन्यथा, प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवा ही ‘जीव धोक्यात घालणारी’ सेवा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



