पाचोरा तालुक्यात विजेचा खेळ, खंडोबा; विद्युत वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२५
पाचोरा तालुक्यातील महावितरण (वीज वितरण कंपनी) यांचा अनागोंदी आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला असून शहरासह ग्रामीण भागातील नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. तालुक्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून, पुरवठा बंद पडल्यानंतर तो सुरळीत होण्यासाठी तब्बल आठ ते दहा तासांचा कालावधी लागतो. परिणामी सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे.
महत्वाची बाब म्हणजे गावागावांत नियुक्त असलेले विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्यामुळे तांत्रिक बिघाड दुरुस्तीला उशीर होतो. अनेक वेळा संबंधित कर्मचारी गावात उपलब्ध नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. काही खेड्यांमध्ये तर संपूर्ण कारभार तथाकथित “झिरो वायरमन”च्या भरवशावर सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. वीजपुरवठा सुरू करण्यासाठी किंवा किरकोळ दुरुस्तीसाठी नागरिकांना खिशातून पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
दरम्यान, आज मंगळवार (दिनांक २ डिसेंबर) मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजेपासून पाचोरा तालुक्यातील जवळपास दहा खेड्यापाड्यांमध्ये अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. रात्री दहा वाजेपर्यंतही हा तांत्रिक बिघाड दुरुस्त न झाल्याने गावोगावी संताप व्यक्त करण्यात आला. अंधारामुळे नागरिकांचे हाल झाले असून, पाणीपुरवठा, मोबाईल नेटवर्क, आरोग्य सेवा यांवरही परिणाम झाला आहे.
ग्रामीण भागात लोडशेडिंग आणि वीजखंडित होण्याचे प्रमाण वाढले असताना महावितरण प्रशासन मात्र उदासीन भूमिका घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वेळेवर दुरुस्ती न होणे, फोन उचलले जात नसणे आणि कर्मचारी अनुपस्थित राहणे या तक्रारी नित्याच्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गावागावांत नियुक्त केलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी वास्तव्यास राहणे सक्तीचे करावे, तसेच झिरो वायरमनच्या बेकायदेशीर हस्तक्षेपावर तात्काळ अंकुश आणावा, अशी ठाम मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशाराही देण्यात येत आहे.
पाचोरा तालुक्यातील विद्युतीकरण व्यवस्थेतील ढिसाळपणा दूर करून तत्काळ सुधारणा न झाल्यास येत्या काळात जनक्षोभ उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.



