मतदान–मतमोजणीतील अंतरामुळे ईव्हीएमवरील संशय अधिक गडद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२५
ईव्हीएम संदर्भातील शंका अधिक तीव्र होण्यामागे मतदान आणि मतमोजणीदरम्यान असलेला तब्बल १८ दिवसांचा कालावधी हे महत्त्वाचे कारण असल्याचे जनमानसातून व्यक्त केले जात आहे. “इतका दीर्घ कालावधी असताना ईव्हीएममध्ये हेराफेरी होऊ शकते,” अशी भीती अनेक सुज्ञ नागरिक व्यक्त करत असून, त्यातूनच बॅटरी वेगळी ठेवण्याची मागणी अधिक जोर धरत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की मतदानाच्या दिवशी स्थानिक पातळीवर दिसणारे मतदानाचे चित्र आणि निकालाच्या दिवशी समोर येणारे आकडे यामध्ये अनेकदा मोठी तफावत जाणवते. “गावपातळीवर, प्रभागनिहाय किंवा बूथनिहाय झालेली चर्चा, मतदानाचा कल आणि प्रत्यक्ष निकाल यांत मेळ बसत नाही,” अशी भावना मतदारांमध्ये वाढीस लागत आहे. या विसंगतीमुळेच ईव्हीएम सुरक्षिततेबाबत संशय अधिक बळावत असल्याचे बोलले जात आहे.
विशेषतः मतदान झाल्यानंतर ईव्हीएम अनेक दिवस स्ट्राँगरूममध्ये ठेवली जात असल्याने त्या काळात नेमकी कोणती प्रक्रिया कशी पार पडते, याची पारदर्शक व सविस्तर माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार आहे. “मतदान आणि मतमोजणी यातील एवढ्या मोठ्या कालावधीत यंत्रे निष्क्रिय ठेवली गेली आहेत का, याची खात्री कशी द्यायची?” असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्यामुळेच, ईव्हीएम जमा करताना बॅटरी वेगळी ठेवणे आणि मतमोजणीच्या दिवशी अधिकाऱ्यांच्या तसेच सर्व पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ती पुन्हा जोडणे, ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे मत अधिक ठामपणे पुढे येत आहे. यामुळे संभाव्य हेराफेरीबाबतच्या शंकांना आळा बसेल आणि निवडणूक प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास पुन्हा दृढ होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या निवडणुकीबाबत जर जनतेच्या मनात शंका राहिल्या, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच मतदान व मतमोजणीतील कालावधी, ईव्हीएमची सुरक्षितता आणि तांत्रिक प्रक्रियेबाबत स्पष्ट, पारदर्शक व विश्वासार्ह खुलासा होणे अत्यावश्यक आहे, अशी एकंदर जनभावना व्यक्त होत आहे.
कारण आजपर्यंत ऑनलाईन पद्धतीने बरेच घोटाळे झाले आहेत व दररोज होत आहेत. बॅंक अकांऊट खाली होणे, एटीएम फ्रॉड, नुकताच झालेला अनुदान घोटाळा असे बरेचसे ऑनलाईन पद्धतीने घोटाळे झाले आहेत मग हे का होऊ शकत नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे




