२ व ३ डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात आठवडे बाजार बंद, निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश.

मकरंद कुलकर्णी.(जळगाव)
दिनांक~२८/११/२०२५
नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वाचे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी नागरिकांची अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी दिनांक २ डिसेंबर २०२५ मंगळवार रोजी आणि दिनांक ३ डिसेंबर २०२५ बुधवार रोजी जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी जारी केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ चा कार्यक्रम दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला असून, त्याच दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर २०२५ मंगळवार रोजी मतदान, तर दिनांक ३ डिसेंबर २०२५ बुधवार रोजी मतमोजणी होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक नगरपालिकांच्या हद्दीत मंगळवार व बुधवार या दिवशी नियमितपणे आठवडे बाजार भरतात. या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने, मतदान तसेच मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अँड फेअर्स अॅक्ट, १८६२ च्या कलम ५ (अ) व (क) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, दिनांक २ आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिका हद्दींमध्ये भरणारे आठवडे बाजार पूर्णतः बंद राहणार आहेत. मात्र, नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेता सदर आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्यासाठी संबंधित नगरपालिकांनी आवश्यक ती पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
