कळमसरा गावात पुन्हा अवैध दारूचा महापूर; दारुबंदीच्या कार्यकर्त्यांना धमक्या, दारु विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/११/२०२५
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोहारा हद्दीत येणाऱ्या कळमसरा गावात अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीचा विळखा पुन्हा घट्ट होत चालला आहे. काही महिन्यांपूर्वी गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी धडक कारवाई करून अवैध दारू तयार करणारे व विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्या वेळी ही कारवाई मोठी दणका म्हणून पाहिली जात होती. व कळमसरा ग्रामस्थांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांचे आभार मानले होते. परंतु ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या माहितीनुसार, या कारवाईची धग काही दिवसांत निवळताच पुन्हा अवैध दारूचे उत्पादन आणि विक्री सुरु झाली आहे. गावाच्या दुर्गमतेचा फायदा घेत काही व्यक्तींनी पुन्हा बेकायदेशीर धंदे सुरू केल्याचे समोर येत आहे.
**********************************************************
तक्रारदारांवर उलट दडपण सुरु.
**********************************************************
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात अवैध धंदे थांबविण्यासाठी धाडसाने तक्रार करणाऱ्या गावातील नागरिकांनाच आता धमक्यांना सामोरे जावे लागत आहे. अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींनी दारुड्यांना मोफत दारु पाजून दारुबंदी करणाऱ्या समर्थकांना शिविगाळ करण्यास प्रवृत्त केल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे गावातील शांतता भंग होत असून तक्रारदार कुटुंबे प्रचंड भीतीत आहेत.
**********************************************************
ग्रामस्थांची प्रशासनाकडे आर्त मागणी.
**********************************************************
सद्यस्थितीत गावातील परिस्थिती धोकादायक व असुरक्षित होत असून, अवैध दारू निर्मिती पुन्हा चालू राहिल्यास गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कळमसरा ग्रामस्थांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीसांना तातडीने मोठी आणि कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण “आम्ही तक्रार केली म्हणून आम्हालाच धमक्या मिळत आहेत. पोलीसांनी कडक पावले उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल,” असे गावातील एका नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. असून गावात पुन्हा सुरू झालेल्या अवैध दारू निर्मितीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
