पिंपळगाव हरेश्वर परिसरात अवैध दारूविरोधात मोठी कारवाई, ५ ठिकाणी धाडसत्र; तब्बल ३ हजार लिटरपेक्षा अधिक दारु व साहित्य नष्ट.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/११/२०२५
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी आज अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर मोठी कारवाई केली आहे. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी विशेष मोहिम राबवून तब्बल चार स्वतंत्र पथकांमार्फत विविध ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या धाडीत ५,८९० लिटर उकळते कच्चे रसायन, १२० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण ३,००,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त किंवा नष्ट करण्यात आला.
==========================================================
गुप्त माहिती; पोलिसांची क्षणाक्षणाला धाव.
==========================================================
सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ. कल्याणी वर्मा यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही संपूर्ण मोहीम उभारण्यात आली. अवैध हातभट्टी दारू तयार करण्यासाठी जंगल, नदीकाठ, धरण परिसर यांचा वापर होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चार पथकांची निर्मिती केली आणि संबंधित शिवारात दबा धरला व एकाचवेळी चार ठिकाणी धाडसत्र राबवण्यात आले.

या धाडसत्रात सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेन्द्र नरवाडे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश तडवी यांच्या पथकाने पिंप्री धरण शिवारात छापा टाकून मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन जप्त करत नष्ट केले. तसेच सहाय्यक फौजदार अरविंद मोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद वाडीले, पोलीस कॉन्स्टेबल योगेश भिलखेड या दुसऱ्या पथकाने लोहारा दुरक्षेत्रातील कुहाड शिवारातील नाल्याच्या काठावर सुरू असलेली गुप्त भट्टी उद्ध्वस्त केली.

तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इगळे या तिसऱ्या पथकाने लोहरी गाव, बहुळा नदीकाठ सुरु असलेल्या हातभट्टी व कच्चे दारूसाहित्य नष्ट केले तर पोलीस हेडकॉन्स्टेबल शांतीलाल पगारे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद वाळले या चौथ्या पथकाने पिंपळगाव शिवारातील घोडसगाव धरण परिसरातील तयार दारू व कच्चा माल जागीच नष्ट केला.

या कारवाईत ३ हजार लिटरहून अधिक सामग्रीचा नाश करत उकळते रसायन, किण्वन टाक्या, भट्ट्या, प्लास्टिक कॅन, तयार दारू इत्यादी एकूण ३,००५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उर्वरित सर्व सामग्रीचा जागीच नाश करण्यात आला, ज्यामुळे मोठा आर्थिक फटका अवैध व्यावसायिकांना बसला असून या कारवाईमुळे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे करणारांणा पळता भुई थोडी झाली आहे.
==========================================================
पाच आरोपींवर गुन्हे दाखल.
==========================================================
अवैध दारु निर्मिती व विक्रीत सामील असल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर येथील हिरकनबाई जगन्नाथ भिल, शिंदाड येथील ऊखर्दु कासम तडवी, सुपडु सिकंदर तडवी, कुऱ्हाड खुर्द येथील विनोद भिला भिल व लोहारी इंदिरानगर येथील संतोष शिवलाल भिल यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई), ६५ (फ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
==========================================================
स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पाऊल.
==========================================================
हातभट्टी दारूमुळे होणारे आरोग्याचे धोके, पर्यावरणीय प्रदूषण आणि गुन्हेगारीला मिळणारा आधार या सर्वांचा विचार करता ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. अवैध धंदेखोरांचे जाळे मोडीत काढण्यासाठी पोलिसांचे हे धाडसत्र कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.



