स्व. वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण; फडणवीसांचा भावनिक गौरव.
कल्याण (वार्ताहर, अशोकराव चव्हाण)
दिनांक~१६/११/२०२५
महाराष्ट्रात हरित क्रांतीचे प्रणेते आणि जलसंधारण, शिक्षण तसेच सामाजिक परिवर्तनाचे अध्वर्यू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच परिसरातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संभाजीनगर येथे संपन्न झाले. या प्रसंगी फडणवीस यांनी स्व. नाईक यांच्या कार्याची प्रखर आठवण करत भावनिक शब्दांत त्यांना अभिवादन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्य प्रगतीपथावर नेण्यात जे नेते शिल्पकार ठरले, त्यात स्व. वसंतराव नाईक हे अग्रणी होते. बंजारा समाजामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य त्यांनी केले.” समाजातील चुकीच्या प्रथा मोडून सामाजिक सुधारणा घडवण्यापासून ते शैक्षणिक संस्थांच्या उभारणीपर्यंत स्व. नाईक यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या स्व. नाईक यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “व्यक्ती किती काळ पदावर असते यापेक्षा त्या काळात ती कोणते कार्य करते हे महत्त्वाचे. १९७२ च्या दुष्काळात त्यांनी हाती घेतलेल्या जलसंधारण मोहिमेमुळे महाराष्ट्र पुन्हा समृद्धीकडे मार्गस्थ झाला.”
पोहरादेवी मंदिर व परिसराचा कायापालट करण्यासाठी ₹७०० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवीला भेट देऊन नंगारा संग्रहालयाचे उद्घाटन केले आणि या संग्रहालयातील पहिला पुतळा स्व. वसंतराव नाईक यांचाच असल्याचा उल्लेख फडणवीस यांनी केला.
बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) तसेच सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना या उपक्रमांचा फायदा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला मंत्री अतुल सावे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री संजय शिरसाट, अनेक खासदार, आमदार आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेला हा कार्यक्रम भव्य व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
