कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसरात उघड्यावर मांस विक्री; महिला, विद्यार्थी व प्रवाशांचा तीव्र संताप. प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/११/२०२५
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावातील बसस्थानक परिसरात उघड्यावर सुरू असलेल्या मांस विक्रीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सार्वजनिक ठिकाणी बोकड व कोंबड्यांची उघडपणे हत्या करून मांस विक्री केली जात असल्याने शाळा, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, महिला व प्रवाशांच्या मनात भीती आणि तिटकारा निर्माण झाला आहे.
==========================================================
सार्वजनिक ठिकाणी उघडपणे मांस विक्री.
==========================================================
कुऱ्हाड खुर्द येथील बसस्थानक परिसर हा गावातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असून, इथे बाहेरगावी जाणारे प्रवासी, महिला व लहान मुले बसची वाट पाहण्यासाठी थांबतात. याच परिसरात काही मांस विक्रेते भररस्त्यावर बोकड आणि कोंबड्यांची हत्या करून मांस विक्री करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. विशेष म्हणजे ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी हे विक्रेते कापलेल्या प्राण्यांचे अवशेष उघड्यावर लटकवून ठेवतात, ज्यामुळे दृश्य पाहून प्रवाशांमध्ये घृणा निर्माण होते.
==========================================================
“महिलांच्या व मुलांच्या मनावर विपरीत परिणाम”
==========================================================
स्थानिक नागरिकांच्या मते, या अशोभनीय प्रकारामुळे बसस्थानक परिसर अस्वच्छ झाला असून, विद्यार्थ्यांच्या मनावर मानसिक परिणाम होतो आहे. “शाळा-कॉलेजला जाणाऱ्या मुलांपुढे अशी दृश्ये दिसणे अतिशय दुर्दैवी आहे. यामुळे गावाची बदनामी होते,” असे नागरिकांनी सांगितले.
==========================================================
आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर.
==========================================================
मांस विक्री करणारे प्राणी खरोखर सुदृढ आहेत की नाही, याची कोणतीही तपासणी होत नाही. स्थानिकांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी गावात काही बकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्याचवेळी काही विक्रेत्यांनी त्या आजारी बकऱ्यांचे मांस स्वस्त दरात विकले असल्याचा संशय आहे. त्यामुळे या ठिकाणी विकल्या जाणाऱ्या मांसाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
==========================================================
प्रशासनाकडे तक्रारींचा पाऊस.
==========================================================
काही सुज्ञ नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मांस विक्री करणे हे आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या नियमांचे उल्लंघन आहे. या बाबतीत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कारवाई करावी.”
==========================================================
नागरिकांची मागणी
==========================================================
कुऱ्हाड खुर्द ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली आहे की, बसस्थानक परिसरातील उघड्यावर सुरू असलेली मांस विक्री त्वरित बंद करण्यात यावी, तसेच संबंधित मांस विक्रेत्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. “गावाच्या स्वच्छतेसह आरोग्य आणि सामाजिक शिस्त राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत,” असे आवाहन नागरिकांनी केले आहे.