भातखंडेतील घरफोडीचा छडा; आरोपी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात! पाचोरा पोलिसांची केवळ चार तासांत यशस्वी कारवाई.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/११/२०२५
पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत पाचोरा पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला जेरबंद करत ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेविषयी अधिक माहिती अशी की, फिर्यादी सोपान भिकन कुमावत (वय ५१, रा. भातखंडे खुर्द) हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ४१,५०० रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५३०/२०२५ भादंवि कलम ३३१ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, या चोरीत कन्हैय्या विनोद कुमावत (वय २५, रा. भातखंडे खुर्द) याचा सहभाग असू शकतो. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेला एकूण ४१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी मोहिमेत पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सपोनि संजय निकुंभ, पोना महेंद्र पाटील, तुषार विसपुते, पोकॉ संदीप राजपूत, जितेश पाटील, हरीश परदेशी, श्रीराम शिंपी, संतोष राजपूत आणि अनिल पवार यांनी मोलाची भूमिका बजावली.
या तातडीच्या आणि अचूक कारवाईमुळे पाचोरा पोलिसांविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, भातखंडे परिसरात पोलिसांच्या सजगतेचे कौतुक होत आहे.
