भातखंडे येथे झंन्नामंन्ना जुगारावर पोलिसांची धाड; दीड लाखांच्या मुद्देमालासह सहा जुगारी ताब्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/११/२०२५
पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द गावात सुरू असलेल्या झन्नामन्ना पत्त्याच्या जुगारावर पाचोरा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अचानक धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १३,५०० रुपयांची रोख रक्कम, पाच मोटारसायकली व पत्त्यांचा कॅट यांचा समावेश आहे.
पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना भातखंडे खुर्द गावात पत्ता जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह धाडसत्र राबविले. या कारवाईदरम्यान निशीकांत राजेंद्र पाटील यांच्या घराशेजारी सुरू असलेल्या झन्नामन्ना जुगारावर पोलिसांनी अचानकपणे छापा टाकला असता याठिकाणी संशयित आरोपी, पंकज सुरेश कुमावत (३२), योगेश जगन्नाथ भिल (५०), निंबा जालम मोरे (२५), निशीकांत राजेंद्र पाटील (३२) — सर्व रा. भातखंडे खुर्द, रमेश मोहन भिल (३४) — रा. दुसखेडा, सुभाष भास्कर पाटील (४८) — रा. गिरड, ता. भडगाव, असे सहा आरोपी झंन्नामंन्ना खेळतांना आढळून आल्यामुळे त्यांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी १३,५०० रुपये रोख, ५ मोटारसायकली, तसेच ५२ पत्त्यांचा कॅट असा एकूण १.६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ, पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी, गजानन देशमुख, वसीम शेख, महेंद्र पाटील, श्रीराम शिंपी, शरद पाटील व गणेश कुंवर यांच्या पथकाने केली व सर्व आरोपींना चौकशीनंतर नोटीस देऊन सोडण्यात आले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, पाचोरा शहरात व परिसरातही झन्नामन्ना नावाचा जुगार खुलेआम सुरू असून, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुज्ञ नागरिकांत सुरू आहे. स्थानिकांनी शहरातील अशा बेकायदा जुगार अड्ड्यांवरही तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

