दारूच्या नशेत मुख्याध्यापकाकडून माजी मुख्याध्यापकास मारहाण; पोलिसांनी फक्त एन. सी. दाखल केल्याने संताप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/११/२०२५
दारूच्या नशेत मुख्याध्यापकाकडून माजी मुख्याध्यापकास मारहाण केल्याची घटना पिंपळगाव हरेश्वर गावात घडली असून या घटनेनंतर राजकीय दबावामुळे पोलिसांनी फक्त एन. सी. दाखल करुन घेत सौम्य कारवाई केली असा आरोप करत पिंपळगाव हरेश्वर येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामविकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्र्वर येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकाने दारुच्या नशेत माजी मुख्याध्यापकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी केवळ साधी एन. सी. (N.C.) दाखल केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, पोलिसांवर राजकीय दबाव आल्याची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. पी. जे. तेली यांनी दारूच्या नशेत काल संध्याकाळी शतपावली करत असलेल्या माजी मुख्याध्यापक श्री. बी. एस. चौधरी यांना शिवीगाळ करत हातघाईला जात मारहाण केली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाचे वैद्यकीय परीक्षण (मेडिकल) न करता केवळ तोंडी कारवाई करत साधी एन. सी. दाखल केली, अशी माहिती समोर येत असून “जर त्यावेळी काही गंभीर अनर्थ झाला असता, तर पोलिसांनी अशीच दुर्लक्षात्मक भूमिका घेतली असती का ?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला.

दरम्यान, गावात दबक्या आवाजात चर्चा आहे की, या प्रकरणात काही प्रभावशाली जिल्हा परिषद सदस्य तसेच दुसऱ्या तालुक्यातील आमदारांनी पोलिसांवर फोनद्वारे दबाव आणल्यानेच सौम्य कारवाई करण्यात आली, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. कारण “एका आदर्श शिक्षकावर दारुड्या मुख्याध्यापकाकडून झालेली ही वागणूक अत्यंत दुर्दैवी आहे. अशा व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्ही गावकऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू,” असा इशारा कामगार संघटना जिल्हा जळगावचे जनरल सेक्रेटरी श्री. किशोर आप्पा गरुड (शिवसेना शिंदे गट) यांनी दिला.
तसेच या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. गावकऱ्यांनी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

परंतु या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा यांनी सांगितले की, “आम्ही तक्रारीनुसार सविस्तर तपासाअंती आवश्यक ती कारवाई केली असून, कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आमच्यावर आलेला नाही. तसेच कायदा सगळ्यांसाठी समान आहे. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये आणि जाणुनबुजून कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करण्यात येईल असे सुचित केले आहे.




