बाळद बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण गाजतंय, विस्तार अधिकारी राजेंद्र धस व गटविकास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; स्थावर-जंगम मालमत्तेच्या चौकशीची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/११/२०२५
पाचोरा तालुक्यातील बाळद बुद्रुक ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या प्रकरणात तत्कालीन विस्तार अधिकारी राजेंद्र धस तसेच त्याकाळातील गटविकास अधिकारी हे देखील भ्रष्टाचारात थेट सामील असल्याचा गंभीर आरोप बाळद बुद्रुकचे ग्रामस्थ व तक्रारदाराकडून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील बाळद बुद्रुक ग्रामपंचायतीतील घरकुल योजना, गोठाशेड योजना, वित्त आयोग निधी आणि पाणीपुरवठा विभागातील कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यांविरोधात नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार अर्ज देऊन कारवाईची मागणी केली असली तरी, संबंधित अधिकारी आणि पंचायत समिती प्रशासनाने त्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
सदर कालावधीत राजेंद्र धस हे पंचायत समिती पाचोरा येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात या योजनांमधून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, धस यांनी लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांची कमाई केली असून, त्यातून त्यांनी संभाजीनगर व बीड येथे आलिशान बंगले उभारले आहेत. या प्रकरणाची चौकशी होण्यासाठी राजेंद्र धस आणि संबंधित गटविकास अधिकाऱ्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पंचायत समिती पाचोरा कार्यालयाने माहिती अधिकार अधिनियमांतर्गत दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे की, बाळद बु. ग्रामपंचायतविषयक तक्रारी आणि त्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील मागील दहा वर्षांच्या कालावधीत विविध विभागांकडून शोधण्यात येत आहे. तथापि, अद्याप या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे दिसून येते. या प्रकरणाने स्थानिक प्रशासन आणि पंचायत राज विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नागरिकांकडून या घोटाळ्याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत आहे.
पाचोरा तालुक्यातील हा कथित भ्रष्टाचार प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनला असून, येत्या काही दिवसांत तपास यंत्रणांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




