जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचा सुळसुळाट, पहूर, वाकोद, सोयगाव परिसरातील जुगार अड्ड्यांवर उधळपट्टी; राजकीय दबावामुळे कारवाई दडपली ?

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/११/२०२५
जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचा सुळसुळाट पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध भागात चलनात नकली नोटा मोठ्या प्रमाणावर फिरत असून, यामागे एक सुसंगठित टोळी कार्यरत असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, या टोळीने पहूर, वाकोद, सोयगाव आणि परिसरातील जुगाराच्या अड्ड्यांना ‘नकली चलन वितरण केंद्र’ म्हणून वापरल्याचे उघड झाले आहे. मागील महिन्यात या अड्ड्यांवर नकली नोटांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला. जुगार खेळताना असली नोटा ओळखून वेगळ्या काढून घेत, नकली नोटांचा वापर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानंतर हे आरोपी रक्कम हातात घेऊन पसार झाले.
या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारींनंतर काही ठिकाणी गुप्त चौकशीही करण्यात आली होती. त्यातून जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील काही खेडेगावांतील तरुण व स्थानिक उद्योजकही या गोरखधंद्यात सामील असल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.
राजकीय दबावामुळे चौकशी थंडगार?
मागील महिन्यात पोलिसांनी या प्रकरणातील काही संशयितांना पकडले होते. मात्र, या संपूर्ण प्रकरणात एका राजकीय वजनदार व्यक्तीचा छुपा हात असल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे. त्यामुळे प्रकरणावर पडदा टाकण्यात आला असल्याची शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने मात्र अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

सुज्ञ नागरिकांची मागणी : सखोल चौकशी आणि कठोर कारवाई व्हावी.
या संपूर्ण प्रकारामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा नकली नोटांचा बाजार फोफावला आहे. व्यापारी, शेतकरी आणि सामान्य नागरिक यांच्यात चलनाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

️निवडणुकीत वापराची शंका.
दरम्यान, जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजताच नकली नोटा मतदार खरेदी किंवा प्रचार खर्चासाठी वापरल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने तसेच आर्थिक गुन्हे शाखेने या घडामोडीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्थानिक पोलिसांनी मात्र नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही संशयास्पद नोटा तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात जमा कराव्यात. तसेच अज्ञात स्त्रोतांकडून मोठ्या रकमेचे व्यवहार टाळावेत असे आवाहन केले असून जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचा फैलाव हा केवळ आर्थिक गुन्हा नसून सामाजिक असुरक्षिततेचा धोकाही आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास हा गैरप्रकार आगामी निवडणुकीत गंभीर रूप धारण करू शकतो, अशी चर्चा जिल्ह्यात सर्वत्र रंगली आहे.




