गाड्यांचा ताफा, व्ही.आय.पी. बॅगांची देवाणघेवाण; पंचक्रोशीत चर्चेला उधाण! शेंदुर्णी, मालखेडा रस्त्यावर एखाद्या चित्रपटासारखा प्रसंग; नागरिकांमध्ये कुतूहलाची चर्चा

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१०/२०२५
जामनेर, पाचोरा रस्त्यावर बुधवारी (दिनांक २९ ऑक्टोबर) दुपारी घडलेला एक रहस्यमय प्रसंग सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे. शेंदुर्णी ते मालखेडा दरम्यान ‘माली फुली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी एकामागोमाग एक चारचाकी गाड्या थांबल्या, काही वेळ बॅगांची देवाणघेवाण झाली, हस्तांदोलन झाले आणि क्षणात गाड्या वेगाने निघून गेल्या, हा संपूर्ण प्रसंग पाहणारे काही गुराखी व शेतकरी अक्षरशः थक्क झाले.
साक्षीदारांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ११.५२ वाजता शेंदुर्णी गावाकडून ‘हाराष्ट्र *सन’ असे नाव असलेली एक चारचाकी गाडी माली फुली परिसरात येऊन थांबली. काही वेळाने अंबे वडगावकडून चार ते पाच गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी दाखल झाला. या ताफ्याने ‘*हाराष्ट्र *सन’ गाडीला चारही बाजूंनी वेढा घातला. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या इसमांमध्ये काही कागदपत्रांची देवाणघेवाण झाली.

यानंतर अंबे वडगावकडून आलेल्या गाडीतून एक इसम मोठी बॅग काढून शेंदुर्णी गावाकडून आलेल्या रुबाबदार व्यक्तीकडे सुपूर्द करतो. दोघेही हस्तांदोलन करून हसऱ्या चेहऱ्याने निरोप घेतात आणि आपापल्या गाड्यांसह निघून जातात. हा प्रसंग काही गुराख्यांनी आणि स्थानिक तरुणांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून, त्यांनी संबंधित दृश्यांची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांना पाठवून ‘हा नेमका काय प्रकार?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
शेतकरी व शेतमजूरांचा दावा आहे की या परिसरात अशा प्रकारच्या बॅग देवाणघेवाणीची घटना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडते. विशेष म्हणजे पहुर, पाचोरा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाल्यापासून हा प्रकार नियमितपणे दिसत असल्याची माहिती स्थानिकांनी “नाव न सांगण्याच्या अटीवर” दिली आहे.
या बॅगांमध्ये नेमके काय असते, त्या कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या व्यवहारासाठी दिल्या जातात, तसेच हीच जागा देवाणघेवाणीसाठी का निवडली जाते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, “गाड्यांचा ताफा, व्ही.आय.पी. बॅगांची देवाणघेवाण” या घटनेने पंचक्रोशीतील जनतेत कुतूहल आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
