कुऱ्हाड खुर्द गावात चोरट्यांची पुन्हा सलामी, शेतकरीवर्ग व सर्वसामान्य नागरिक भयभीत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१०/२०२५
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावात मागील एक वर्षापासून चोऱ्यांचे सत्र सुरुच असून आजपर्यंत बैलजोडी, वाळू, गहू चोरीला गेला होता. तसेच तारांगण हॉटेलमध्ये तीनवेळा चोरी झाली, बसस्थानक परिसरातील एक दुकान तीन वेळा फोडण्यात आले अशा लहानमोठ्या चोऱ्या झाल्या असून याची सखोल चौकशी करुन आजपर्यंत चोरट्यांना जेरबंद करण्यात आले नसल्याने दिवसेंदिवस चोरट्यांची हिंमत वाढत चालली आहे.

अशातच काल दिनांक ०९ ऑक्टोबर गुरुवार रात्रीपासून ते १० ऑक्टोबर २०२५ शुक्रवारच्या सकाळपर्यंतच्या वेळात कुऱ्हाड खुर्द येथील शेनफडू रामकृष्ण चौधरी यांच्या मालकीचे घरासमोर उभ्या असलेल्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरची पावर झोन कंपनीची ९०००/०० रुपये किंमतीची बॅटरी चोरीला गेली असून बसस्थानक परिसरातील गजानन कडुबा सरोदे यांच्या मालकीचे पवन शॉप नावाचे टपरीवजा दुकान फोडून दहा, वीस रुपयांच्या नोटा व चिल्लर पैसे अशी अंदाजे १०००/०० रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
मागील एक वर्षापासून कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गाव परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरुच असून आजपर्यंत चोरट्यांचा तपास लागला नसल्याने दिवसेंदिवस चोरांची शिरजोरी वाढत चालली असून शेतकरीवर्ग व सर्वसामान्य नागरिक चिंतेत पडले आहेत. तसेच हे चोरटे स्थानिक परिसरातीलच आहेत अशी जोरदार चर्चा कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावातील नागरीकांमध्ये ऐकायला मिळत असल्याने आता नव्यानेच हजर झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा यांनी व सहकारी पोलीसांनी याबाबत जातीने लक्ष घालून चोरट्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.



