स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०६/२०२५
मागील आठवड्यात निसर्गाने अचानकपणे रुद्र रुप धारण केले व वादळीवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात वादळामुळे मोठमोठे महाकाय वृक्ष, विजेचे खांब उन्मळून पडल्याने हि उन्मळून पडलेली झाडे व विजेचे खांब रहदारीच्या रस्त्यावर पडल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला. सोबतच जोरदार पाऊस झाल्याने सांडपाण्याच्या गटारी तुडुंब भरुन वाहत असतांना घराघरांमध्ये पाणी शिरले तसेच शेतातील मोसंबी, केळी व इतर पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सगळीकडे अंधार व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊन दैनंदिन व्यवहार ठप्प झाले तसेच विद्युत वाहिनीच्या तारा व खांब तुटून पडल्याने सगळीकडे अंधार झाला.
अशा बिकट परिस्थितीत एकाबाजूला जो, तो आपण व आपला परिवार कसा सुखरुप राहिल म्हणून दरवाजे, खिडक्या बंद करुन विजेच्या कडकडाटापासून बचाव करण्यासाठी कानात बोटे घालुन लाईट केव्हा येईल, रस्ते कधी उघडतील यासाठी भ्रमणध्वनीवर संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत होते तर दुसरीकडे महसूल विभाग, विज वितरण कंपनीचे व नगरपालिकेने अधिकारी व कर्मचारी स्वताच्या कुटुंबाला देवाच्या भरवशावर सोडून सर्व जनताच आपल कुटुंब आहे व आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात बाळगून रात्रंदिवस भर पावसात अंधारात जीवाची पर्वा न करता अन्नपाणी, झोप, विश्रांतीचा त्याग करुन सतत ३६ सेवा बजावून रस्त्यावरची पडलेली झाडे, विजेचे खांब, तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या तारांची दुरुस्ती करुन सगळीकडचा विद्युत पुरवठा व दळणवळणाचा रस्ता खुला करुन देत सर्व तालुका प्रकाशमय केला.
तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. श्री. मंगेश देवरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सतत ३६ तास काम करुन पाचोरा शहरातील रस्त्यावर पडलेली झाडे, विद्युत वाहिनीच्या तारा, विद्युत खांब त्वरित उचलून व विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या सहकार्याने तडकाफडकी विद्युत पुरवठा सुरळीत करत तुडुंब भरलेल्या गटारी मोकळ्या करुन ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यातिल पाणी वाहते करत पाचोरा शहरातील रहिवाशांना रस्ता मोकळा करुन दिला.
तसेच मा. प्रांताधिकारी, या. तहसीलदार यांनी आपल्या सहकाऱ्यांना व आपत्ती व्यवस्थापन पथकाला सोबत घेऊन रस्त्यावर पडलेली झाडे, शेती मालाचे झालेले नुकसान, घरांची झालेली पडझड, पुरात वाहून गेलेले पशुधन तसेच विज पडून झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन संबंधितांना लवकरात, लवकर मदत करण्यासाठी तासंतास बसून अहवाल तयार केला व तो वरिष्ठांना सादर केला याची दखल घेऊन पाचोरा पत्रकारांनी या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
**************************************************
धारेवर धरणाऱ्या पत्रकारांनी स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा केला जाहीर सत्कार.
**************************************************
महसूल विभाग, विद्युत वितरण कंपनी व नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फक्त अधिकारी व कर्मचारी म्हणून नव्हे तर आपण या समाजाचे काही देणे लागतो, आपणही याच समाजाचे एक घटक आहोत ही भावना मनात बाळगून सामाजिक दायित्व म्हणूनच नव्हे तर कर्तव्य समजून वाळवाऱ्यासह होणाऱ्या पावसात, अंधारात तसेच नगरपालिका व विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी गुढग्याबरोबर पाण्यात उतरुन जीवघेणी कसरत करत जी, जी पार पाडली यांचे भान ठेवून जनहितार्थ पत्रकारिता करतांना थोड्या, थोड्या विषयावर किंवा समस्या सोडविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या पत्रकारांनी जीवाची पर्वा न करता तारेवरची कसरत करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे व जनतेचे संबंध दृढ व्हावेत म्हणून तसेच त्यांना भावनिक प्रेरणा मिळावी म्हणून सत्कार करण्याचा निर्णय घेऊन व तो तडकाफडकी अमलात आणण्यासाठी लगेचच पाचोरा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रसिद्ध निलम हॉटेल जवळ एकत्रित येऊन सत्कार करण्याचा एकमुखी निर्णय घेतला.
सर्व पत्रकारांनी महसूल विभाग, विद्युत वितरण कंपनी, नगरपालिका या तिन्ही यंत्रणेच्या कार्यालयात जाऊन वर्ग एक ते वर्ग चार पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. या सत्कारार्थींमध्ये मा. प्रांताधिकारी, मा. तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, पटवारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, सहायक अभियंते, शाखाधिकारी, विज वितरण कंपनीचे शाखाभियंता, सहाय्यक शाखाभियंता, लाईनमन, विद्युत सहाय्यक तसेच सफाई कामगार, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, वाहनचालक यांचा समावेश होता. हा सत्कार स्वीकारताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे व कृतज्ञतेचे भाव दिसून येत होते.
*************************************************
देव कुणाला दिसत नसला तरी संकटसमयी देवाचा धावा करणाऱ्यांसाठी महसूल विभाग, विद्युत वितरण कंपनी, नगरपालिका व प्रशासनातील इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देवदूत बनुन जी जबाबदारी पार पाडली याची दखल घेऊन पाचोरा पत्रकारांनी सत्काराचा जो प्रेरणादायी कार्यक्रम घडवून आणला यामुळे शासन, प्रशासन व सर्वसामान्य जनतेचे संबंध दृऊ झाल्याचे दिसून येत आहे.