पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०६/२०२५
पाचोरा शहरातील बाहेरपुरा येथील माहेरवाशीण डॉ. स्नेहल प्रीतम रावते वय वर्षे (२४) यांचा दिनांक १६ जून २०२५ सोमवार रोजी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथून जवळच असलेल्या गोंदेगावा फाट्याजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत अपघात होऊन या अपघातात त्यांचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेमुळे पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात असून मयत डॉ. स्नेहल प्रीतम रावते यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे लंडनला जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक १६ जून २०२५ सोमवार रोजी डॉ. स्नेहल प्रीतम रावते व त्यांचे वडील किशोर पेंढारकर हे पासपोर्ट संदर्भात कागदपत्रे घेऊन पोलीसांना देण्यासाठी गेले होते. कागदपत्रे देऊन ते परत पाचोरा शहराकडे निघाले असता रात्रीच्या वेळी जामनेर ते पाचोरा दरम्यान शेंदुर्णी येथून जवळच असलेल्या गोंदेगाव फाट्याजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने किशोर पेंढारकर चालवत असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली या दिलेल्या धडकेत डॉ. स्नेहल प्रीतम रावते या वाहनाखाली चिडल्या गेल्याने त्यांचा जागेवर दुर्दैवाने मृत्यू झाला.
हा अपघात होताच आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली व तात्काळ पोलीसांना कळवले घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशन व शेंदुर्णी दुर क्षेत्राच्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व परंतु डॉ. स्नेहल प्रीतम रावते यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहून पोलीसांचे व मदतीसाठी जमलेल्या ग्रामस्थाचे डोळे पाणावले होते तर किशोर पेंढारकर यांनी आपल्या मुलीच्या लंडन येथील उच्च शिक्षणाचे स्वप्न पहात असलेल्या डोळ्यादेखत मुलीचा अपघात झाल्याचा प्रसंग ओढावल्याने त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत आसवांचा पूर दाटला होता.
डॉ. स्नेहल प्रीतम रावते या पाचोरा येथील समाजसेवक किशोर पेंढारकर यांच्या प्रतिष्ठीत कुटुंबातील कन्या असल्याने संपूर्ण पाचोरा शहर व तालुक्यातून जनतेतून तसेच वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.