पाचोरा शहराजवळील हिवरा नदीच्या पुलाला भगदाड, मोठा अपघात होण्याची दाट शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०४/२०२५
पाचोरा ते वरखेडी रस्त्यावर पाचोरा येथील जारगाव चौफुली ते भारत डेअरी रस्त्याच्या दरम्यान हिवरा नदीवरील मोठा पुल बांधण्यात आला आहे. या पुलाचे बांधकाम सुरु होते तेव्हा हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत बऱ्याचशा सुज्ञ नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. परंतु संबंधित बांधकाम ठेकेदार व या पुलाच्या बांधकामावर नियुक्त केलेले जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने सुज्ञ नागरिकांना वेड्यात काढले व पुलाचे तसेच काम पुर्ण केले आहे.
परंतु या रस्त्यावरुन अवजड वाहनांसह लहान, मोठी वाहने व प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे या कमकुवत बांधकाम झालेल्या पुलावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या पुलावरुन अवजड वाहन जातांना हा पुल झुलत्या पुलासारखा हलत (थरारत) असल्याचा अनुभव वाहनधारकांनी सत्यजित न्यूज कडे कथन केला आहे. तसेच आता कडकडीत उन्हाळ्यात या पुलावरील डांबर वितळून ठिकठिकाणी आरपार खड्डे पडले असल्यामुळे या खड्ड्यातून थेट नदीपात्रातचे दर्शन होत असल्याचे दिसून येते.
या पुलाचे त्वरित सर्वेक्षण होऊन त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा एखाद्यावेळी या पुलावरुन अवजड वाहन जातांना पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अवजड वाहन पलटी होऊन मोठा अपघातात जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुज्ञ नागरिक व वाहनधारकांनी केली आहे.