शिंदाड ते गव्हले व शिंदाड ते वडगाव कडे रस्त्यावर पैशांच्या पावसात अनेक घरे उध्दवस्त होण्याची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०४/२०२५
सद्यस्थितीत सगळीकडे सण, उत्सव व महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे केले जात आहेत. हे सण, उत्सव साजरे केले जात असल्याने आपल्या नव्या पिढीला परंपरागत परंपरा, संस्कृती व आपल्या देव, देवतांची ओळख होऊन संस्कृती टिकून राहण्यासाठी तसेच महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे केले जात असल्याने आपल्या धर्मासाठी, देशासाठी व स्वातंत्र्यासाठी या महान नेत्यांनी केलेल्या महान कार्याच्या इतिहासाची उजळणी होऊन नवीन पिढीला यातून संस्कार व देशप्रेम जागे होऊन देशात आपण त्यांचे ऋण फेडण्यासाठी व त्यांनी दिलेल्या संस्काराव पावले ठेवून सुखी, समाधानाने, गुण्यागोविंदाने रहात आहोत.
परंतु या सगळ्या रुढी परंपरांना काही विकृत स्वभावाच्या लोकांनी पायदळी तुडवून समाजविघातक कामे सुरु केली आहेत. यात कमी श्रमात जास्त पैसा कमावण्याच्या नादात सट्टा, पत्ता, जुगार, अवैध दारुची निर्मिती व विक्री करत असल्याने आज गावागावात, गल्लीबोळात हे अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याचे दिसून येत असून यामुळे अल्पवयीन मुले, तरुण वर्ग, म्हातारे अर्क या व्यसनाच्या आहारी जाऊन हजारो कुटुंबे यात बर्बाद होत आहेत.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड गावापासून काही अंतरावर सुरु असून शिंदाड पासून काही अंतरावर गव्हले रस्त्यावर तसेच शिंदाड पासून काही अंतरावर वडगाव कडे रस्त्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तर कधी, कधी झाडाच्या सावलीत दिवसाढवळ्या भररस्त्यावर झन्ना, मन्ना (फटकी) चालाचाली म्हणजे (तीन पत्ति) जुगाराचे अड्डे सुरु असून या जुगाराच्या अड्ड्यावर शिंदाड, वडगाव कडे, पिंपळगाव हरेश्वर, गव्हले, सार्वे पिंप्री, डोंगरी सातगाव येथील अल्पवयीन मुले, तरुण वर्ग व जेष्ठ नागरिक जुगार खेळण्यासाठी येत असल्यामुळे याठिकाणी जणूकाही रात्रंदिवस पैशाचा पाऊसच पडतो की काय असा अनुभव या रस्त्यावरुन जाणाऱ्या, येणाऱ्या लोकांना येत असल्यामुळे सुज्ञ नागरिकांनी या जुगाराच्या अड्ड्याबाबत नाराजी व्यक्त केली असून या जुगाराच्या अड्ड्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
कारण सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात रब्बी हंगामाचे तसेच वर्ष बदल होत असल्याने नवीन कर्ज घेतलेले पैसे तसेच मजुरांना मिळणारी मजूरी व अक्षयतृतीयाला शेतकऱ्यांकडे सालदारी करणारे सालदार म्हणजे शेतात काम करण्यासाठी बारा महिन्यांच्या करारावर बोली ठरवून घेतलेले पैसे हातात आले आहेत. व लालसेपोटी पैसे दुप्पट करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी बरेचसे लोक या जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन आपलं नशीब आजमावून पाहत आहेत. परंतु याठिकाणी गेल्यावर हे काही लोक दररोज हजारो तर काही लोक शेत जमीन, घर किंवा संसारोपयोगी वस्तू गहाण या जुगाराच्या अड्ड्यावर लाखो रुपये जुगाराच्या खेळात गमावत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या जुगार अड्ड्यामुळे शेकडो घरे उध्दवस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हे जुगाराचे अड्डे त्वरित बंद करण्यात यावेत अशी मागणी सुज्ञ नागरिक व महिला वर्गातून केली जात आहे.
**************************************************
वळण बांधले आहे, आमचे हात लांब आहेत.
**************************************************
शिंदाड परिसरात सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन काही सुज्ञ नागरिकांनी हे जुगाराचे अड्डे बंद करण्यासाठी प्रयत्न केले मात्र संबंधित जुगार अड्ड्याच्या चालकांनी अरेरावीची भाषा करत आम्ही वळण बांधले आहे. तुम्ही कुठेही जा आमचे काही होणार नाही तसेच आमचे हात खुप लांब आहेत असे सांगितले व संबंधित सुज्ञ नागरिकांना धुडकावून लावले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हे जुगाराचे अड्डे बंद न झाल्यास काही सुज्ञ नागरिक महिलांना सोबत घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले जात आहे.