पिंप्री (डांभुर्णी) धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी सुरु, आसपासच्या गावांना पाणी टंचाईची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०४/२०२५
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथुन जवळच असलेल्या पिंप्री (डांभुर्णी) गावाजवळ उतावळी नदीवर धरण बांधण्यात आले असून या धरणातून पिंप्री, डांभुर्णी, चिंचपूरे या गावांसाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तसेच याच धरणात पिंप्री, डांभुर्णी, पिंपळगाव हरेश्वर, कोल्हे, भोजे, चिंचपूरे, अंबे वडगाव बुद्रुक, मोराड या गावातील पाळीव गुरेढोरे तसेच जंगलातील प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात.
परंतु याच पिंप्री धरणातून आजही विनापरवानगी अनाधिकृतपणे कधी विद्युत पंपाच्या साहाय्याने तर विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर डिझेल मशीनच्या साह्याने रात्रंदिवस पाणी चोरी केली जात असून या धरणातून पाणी चोरी करुन एक इसम हे पाणी स्वमालकीच्या विहीरीत घेऊन या पाण्याचा दुसरीकडे वापर करत आहे.
वास्तविक पाहता रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी काही शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडून रितसर परवानगी घेऊन पाणी उचलून रब्बी पिके घेतली व आता पाणी उचलची तारखेनुसार मुदत संपल्यानंतर त्यांनी पिंप्री धरणातील विद्युत पंप काढून नेले आहेत. असे असले तरी एक इसमाने सर्व कायदे धाब्यावर बसवून या धरणातून आजही पाणीचोरी करत असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती आले आहे.
तसेच ही पाणी चोरी अशीच सुरु राहिल्यास वरिल गावांना पिण्याच्या व गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल म्हणून ही पाणी चोरी त्वरित थांबवावी अशी मागणी पशुधन पालक सुज्ञ नागरिकांनी केली आहे.