पाचोऱ्याचा गुटखा किंग न्यायालयीन कोठडीत, तरीही गुटख्याचे वितरण केले जातेय धान्यांच्या पोतडीत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०४/२०२५
पाचोरा शहरात शासनाने प्रतिबंधित केलेला गटखा मोठ्या प्रमाणात येणार असल्याची गोपनीय माहिती ०१ एप्रिल २०२५ मंगळवार रोजी पाचोरा पोलीसांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पाचोरा पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन वरखेडी नाक्यावर गुप्त पध्दतीने सापळा रचून भरधाव वेगाने जाणारे वाहन थांबवून त्या गाडीमध्ये ३० लाख ५४ हजार रुपये किंमतीचा ६८ गोण्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला विमल नावाचा गुटखा, पानमसाला, तंबाखू सदृश्य पदार्थ आढळून आल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी वाहन चालकासह सदरचे वाहन जप्त करुन पाचोरा पोलीस स्टेशनला आणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करुन संबंधित गुटखा किंगला पाचोरा येथील मा. न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यामुळे पाचोरा येथील सिंधी कॉलनी येथील रहिवासी व संपूर्ण जिल्ह्यात गुटखा किंग म्हणून ओळखला जाणारा सनी टेकचंद पंजाबी हा आय. पी. सी. कलम १२३, २२३, २७४, १७५ सह अन्न, सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्ह्यातील कलमाखाली न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याने तो आज जळगाव येथील कारागृहात बंदिस्त आहे.
असे असले तरी मात्र पाचोरा, भडगाव शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांवर आजही शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणात ठोक व किरकोळ विक्री दिवसाढवळ्या, राजरोसपणे केली जात असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे पाचोरा शहरातील गुटखा किंगची एक चौकडी या गुटखा वितरणाच्या कामात सक्रिय असून पाचोरा पोलीसांनी गुटखाबंदी करण्यासाठी कंबर कसली असल्याने ही गुटखा वितरण करणाऱ्या चौकडीने नवीन शक्कल लढवून बाहेर गावाहून येणारा गुटखा पाचोरा शहराचे आसपासच्या शिवारात सुरक्षित ठिकाणी उतरवून हा गुटखा धान्याच्या किंवा रासायनिक खतांच्या गोणीमध्ये भरुन लगेचच पाचोरा, भडगाव शहरासह दोघेही तालुक्यातील खेड्यापाड्यातील किरकोळ विक्री करणाऱ्या गुटखा विक्रेत्यांच्या मागणीनुसार दुचाकीवरुन किंवा स्वमालकीच्या खाजगी अलिशान चारचाकी वाहनातून घरपोच सेवा देत असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती आले आहे.
गुटखा किंग न्यायालयीन कोठडीत आहे तरीही गटख्याची विक्री सुरुच असल्याने या गुटख्याची विक्री आजच्या परिस्थितीत न्यायालयीन कोठडी असलेल्या गुटखा किंगची टोळी करत असल्याचे बोलले जात असले तरी अजून कुणी दुसरा गुटखा किंग पाचोरा व भडगाव तालुक्यात सक्रीय आहे की काय ? याचा शोध घेण्यासाठी पाचोरा व भडगाव पोलीसांनी शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच अवैध गुटख्याची विक्री सुरुच राहिल्यास “पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है” असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
*************************************************
पाचोरा वासियांना येतेय पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांची आठवण.
**************************************************
मागील काळात पाचोरा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप असतांना पाचोरा शहरातच नव्हे तर आसपासच्या पाच किलोमीटर अंतरावरील गावात गुटख्याची विक्री करण्यासाठी कुणीही धजावत नव्हते तसेच इतर अवैध धंदे करणारांची बोबडी वळत होती. सोबतच पाचोरा शहरात वाहतूक व्यवस्थेला चांगली शिस्त होती व रात्री सगळीकडे “दहाच्या आत घरात” हा ठरलेला नियम होता. तसेच आज एका बाजूला कारवाई केली जाते व दुसरीकडे गुटखा विक्री तशीच सुरु असल्याने पाचोरा येथुन बदलून गेलेले पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांच्या कारकीर्दीची चर्चा व आठवण आजही पाचोरा वासियांच्या तोंडून ऐकायला मिळते आहे.
आजच्या परिस्थितीत पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. अशोक पवार, पोलीस निरीक्षक मा. श्री. दिनेश भदाणे यांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडून देत कायदा काय असतो हे दाखवून दिले व पाचोरा शहरातून तसेच संपूर्ण तालुक्यातील जनतेतून कौतुकाला पात्र ठरले आहेत. परंतु आजही पाचोरा शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांवर अवैध गुटख्याची विक्री व इतर अवैध धंदे कायमस्वरुपी, राजरोसपणे सुरु असल्याने या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कधी कारवाई केली जाईल याबाबत सर्वसामान्य जनतेतून प्रश्न उपस्थित केला जात आहे.