शेजारच्याने केला घात, पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी घेतले लगेचच ताब्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०४/२०२५
शेजारधर्म म्हणजे आपल्या शेजाऱ्यांशी वागण्याचा धर्म भारतीय संस्कृतीत शेजारधर्मला खूप महत्त्व आहे. शहरात गल्ल्या, वाडे, वस्त्या आणि चाळीत
संस्कृतीक शेजारधर्माचा सुवर्णकाळ अनुभवत आहोत. परंतु आता दिवसेनदिवस माणसाच्या वागण्यात स्वार्थ आणि व्देषभाव वाढत चालला असून ‘कुत्र्याला गती व माणसाला प्रगती’ सहन होत नाही. तसेच सद्यस्थितीत सगळीकडे स्वार्थ व व्यसनाधीनता वाढत चालली असून स्वार्थासाठी काही लोक काहीही करायला तयार असतात. असाच काहीसा अनुभव पाचोरा तालुक्यातील पिंप्री सार्वे गावात आला असून वेळप्रसंगी ज्याच्या भरवशावर घर सोडून जात होते त्यानेच विश्वासघात केल्याची घटना घडली आहे.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंप्रि सार्वे
गावात घडला असून पिंप्रि सार्वे येथील सेवानिवृत्त सैनिक व अल्पभूधारक शेतकरी आनंदराव विठ्ठल पाटील वय वर्षे (६०) यांच्या पत्र्याचे पत्री खोलीतून दिनांक ०६ एप्रिल रविवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपासून ते दिनांक ०७ एप्रिल २०२५ सोमवार सकाळी वाजे दरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने घरात अधिकृतपणे प्रवेश करुन घरातील पन्नास ग्रॅम सोन्याचा कडे, दहा ग्रॅमचा नेकलेस व इतर सोन्याच्या दागिन्यांसह सहा तोळे सोने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती.
ही घटना लक्षात येताच आनंदराव पाटील यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक या. श्री. प्रकाश काळे यांनी दिनांक ०७ एप्रिल २०२५ सोमवार रोजी अज्ञात व्यक्तींविरोधात भाग गुन्हा रजिस्टर नंबर ८३/२०२५ भारतीय न्याय दंड संहिता २०२३ चे कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला होता.
व जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी साहेब, चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती कविता नेरकर, पाचोरा उपविभागीय अधिकारी मा. श्री. धनंजय वेरुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रकाश पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. अमोल पाटील, श्री. नामदेव इंगळे, इमरान पठाण यांचे पथक तयार करुन तपास सुरु केला.
या तपासाअंती मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तक्रारदार आनंदराव पाटील यांच्या घराशेजारी रहाणारा राजेंद्र किसन पाटील वय वर्षे (४२) पिंप्रि सार्वे या संशयित आरोपीला काही तासांतच ताब्यात घेऊन पोलीस हिसका दाखवत विचारपूस केली असता राजेंद्र पाटील याने चोरी केल्याची कबुली दिली व आनंदराव पाटील यांच्या घरातून चोरुन नेलेले ५० ग्रॅम सोन्याचे कडे, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, ०२ चांदीचे पायातील पैंजण असा सुमारे ४,८२,०००/०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन राजेंद्र पाटील याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे करीत आहेत.