पारोळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकटपणे पंचनामे करावे, शेतकरी नेते सुनील देवरे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०४/२०२५
पारोळा तालुक्यात काल रात्री अवकाळी पाऊस होऊन झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आडगाव, सावरखेडे, करमाड, जुर्वार्डी, तामसवाडी, मंदाने यासह जवळपास साठ टक्के शेती शिवारात अवकाळी पावसाने थैमान घातले व गारपिट होऊन ज्वारी, बाजरी, कांदा, डाळिंब, लिंबू, पपई, मका या हाती आलेल्या पिकांचे खुप मोठे नुकसान झाले असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला घेतला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. तसेच हजारो रुपये किंमतीचा चारा नष्ट झाल्यामुळे दुग्धव्यवसाय करणारांना चाऱ्याची कमतरता जाणवणार असल्याने दुग्धव्यवसाय कसा करायचा हे संकट येऊन ठेपले आहे.
यावर्षी जुन महिन्याच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित असलेले पावसाळी खरिपाचे पिक हाती आले नाही. जेमतेम पावसाळी शेतमाल घरात येत नाही तोच बाजारभाव गडगडल्यामुळे कृषी केंद्र, मजुरी व इतर देवाणघेवाण करण्यासाठी मिळेल त्या भावात कष्टाने कमावलेला शेतमाल मातीमोल भावाने विक्री करुन मरणाला रात्र आडवी करुन पावसाळ्यात पाहिजे तसे उत्पन्न आले नाही म्हणून शेतकरी राजा पुन्हा नव्या उमेदीने रब्बीच्या हंगामात तरी आपण दोन पैसे कमाऊ या आशेने शेतात कष्ट करुन झालेल्या नुकसानीची भरपाई काढण्याचे स्वप्न रंगवत होता.
अशातच काल रात्री अचानकपणे वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व गारपिटीमुळे होत्याच नव्हत झालं आहे. म्हणून शासनाने कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता पारोळा तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन सरसकट पंचनामे करुन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, शेतकरी नेते मा. श्री. सुनील देवरे यांनी केली आहे.
काल रात्री पारोळा तालुक्याला अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपून काढले म्हणून शेतकरी नेते मा. श्री. सुनील देवरे यांनी सकाळ होताच आडगाव, सावरखेडे, करमाड, जुर्वार्डी, तामसवाडी, मंदाने यासह सगळ्या बाधित क्षेत्रात शिवार फेरी करुन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व तहसीलदार मा. श्री. अनिल पाटील साहेब व तालुका कृषी अधिकारी मा. श्री. आहेर साहेब यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क करुन झालेल्या नुकसानीचे सरसकटपणे पंचनामे करण्यासंदर्भात चर्चा केली.
निवडणूक काळात शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल असे सांगितले होते. परंतु सत्ता हातात आल्यावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घुमजाव केले व हा कर्जमाफीचा मुद्दा एक जुमला ठरला तदनंतर जेमतेम खरीपाचे पिक हाती आले परंतु कोणत्याही शेत मालाची शंभर टक्के हमीभावाने खरेदी केली नाही म्हणून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल मातीमोल भावाने विकावा लागला. याच अडचणीत महाराष्ट्र दररोज कुठेतरी कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या घटना घडत आहेत.
खरीप हंगाम जेमतेम हाती आला, हाती आलेल्या शेत मालाला योग्य भाव मिळाला नाही तरीही शेतकऱ्यांनी मरणाला रात्र आडवी करुन उधार, उसनवार करुन रब्बी हंगामात काहीतरी हातात येईल या आशेवर शेतात राबत असतांनाच काल रात्री झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे होत्याच नव्हत झालं आहे. म्हणून शासनाने आतातरी शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी झालेल्या नुकसानीचे सरसकटपणे पंचनामे करुन भरघोस मदत करावी तरच शेतकरी टिकेल नाहीतर या शेतीप्रधान देशातला शेतकरी देशोधडीला लागले अशा संतप्त भावना शेतकरी नेते मा. श्री. सुनील देवरे यांनी व्यक्त केल्या.