नाकाबंदी दरम्यान अनाधिकृत गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाचोरा पोलीसांच्या दबंग कारवाईत ३० लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०४/२०२५
पाचोरा शहरात शासनाने प्रतिबंधित केलेला गटखा मोठ्या प्रमाणात येणार असल्याची गोपनीय माहिती ०१ एप्रिल २०२५ मंगळवार रोजी पाचोरा पोलीसांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पाचोरा पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन वरखेडी नाक्यावर गप्त पध्दतीने सापळा रचून नाकाबंदी केली होती.
याच दरम्यान जामनेर रस्त्यावरुन एक भरधाव वेगाने जात असल्याने पोलीसांचा संशय बळावला म्हणून पोलीसांनी संबंधितांना वाहनचालकांचा गाडी थांबवण्यासाठी इशारा केला तेव्हा पोलीसांना पाहून संशयित वाहनधारकांने गाडी भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहकाला गाडी थांबवण्यासाठी भाग पाडले.
गाडी थांबताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडीची झाडाझडती घेतली असता त्या गाडीमध्ये ३० लाख ५४ हजार रुपये किंमतीचा ६८ गोण्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला विमल नावाचा गुटखा, पानमसाला, तंबाखू सदृश्य पदार्थ आढळून आला याबाबत चालकाकडून माहिती जाणून घेतली त्याच्या ताब्यातील वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेला लाखो रुपये किंमतीचा गुटखा असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी वाहन चालकासह सदरचे वाहन जप्त करुन पाचोरा पोलीस स्टेशनला आणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु केला.
या तपासाअंती सदरचा प्रतिबंधित गुटखा हा पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी ज्याने गुटखा किंग म्हणून नावलौकिक मिळविला आहे त्याचा असल्याचे निष्पन्न झाल्यावरुन जप्त करण्यात आलेला वाहनमालक, वाहनचालक व गुटखा किंग विरोधात पाचोरा पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करुन संबंधित संशयित आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता दोघांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाहून नेणारे वाहन एम. एच. ५२/७०३४, चाळीसगाव सिंधी कॉलनी येथील रहिवासी वाहन चालक दत्तू लालदास बैरागी वय वर्षे (३१), पाचोरा येथील सिंधी कॉलनी येथील रहिवासी व संपूर्ण जिल्ह्यात गुटखा किंग म्हणून ओळखला जाणारा सनी टेकचंद पंजाबी याच्यासह ३० लाख ५४ हजार रुपये किंमतीचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पान मसाला, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात येऊन संशयित आरोपींना अटक करुन त्यांच्याविरुद्ध आय. पी. सी. कलम १२३, २२३, २७४, १७५ सह अन्न, सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव परिमंडळच्या अप्पर पोलीस अधिक्षक मा. श्रीमती कविता नेरकर पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक श्री. सोपान गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी, समीर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी पार पाडली आहे.