सोयगाव शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ, वैद्यकीय अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०३/२०२५
सोयगाव तालुक्याच्या शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घातला असून गरजू रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याने गरजू रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे मागील दोन वर्षांपासून आजपर्यंत जवळपास सात ते आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून अशा घटना घडल्यानंतर आर्थिक देवाणघेवाण करुन या गैर प्रकारांवर पडदा टाकण्यात आला असल्याने याची कुठेही नोंद झाली नसल्याने आजही सोयगाव शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात बोगस डॉक्टरांनी विशेष करुन बंगाली बाबूंनी धुमाकूळ घातला असून ते रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळत असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी तसेच मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सोयगाव शहरासह तालुक्यातील बऱ्याचशा खेड्यापाड्यात काही तरुणांनी व परप्रांतीय बंगाली बाबूंनी कोणतेही शासनमान्य वैद्यकीय शिक्षण न घेताच फक्त आणि फक्त अनुभवाच्या आधारावर किंवा पर प्रांतातील वैद्यकीय शिक्षण घेतल्याचे सर्टिफिकेट घेऊन आपले दवाखाने थाटले आहेत. विशेष म्हणजे हे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यासाठी जी औषधे वापरतात त्या औषधाची फक्त नावे पाठ आहेत. मात्र त्या औषधांमध्ये असलेले घटक त्यांचा शरीरावर होणारा परिणाम माहित असलातरी त्या औषधाने काय दुष्परिणाम (Effect Side Effect) होतात याचा कोणताही सखोल अभ्यास नसल्याने तसेच काही बोगस डॉक्टरांना टॅबलेट व कॅप्सुल म्हणजे काय यातील फरक कळत नसल्याची माहिती समोर येत असून असे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीविताला धोकादायक ठरत आहेत.
तसेच हे बोगस डॉक्टर फक्त आणि फक्त कमीशन मिळवण्यासाठी त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना गरज नसतांना रक्त, लघवी, थुंकी व इतर टेस्ट करण्यासाठी सांगुन त्यांच्या इच्छीत लॅबोरेटरी मध्ये पाठवून कमीशन लाटत असल्याची तसेच रुग्णांच्या मनात भिती निर्माण करुन गरज नसतांना सलाईन लावून वारेमाप पैसा कमावत आहेत तसेच या बोगस डॉक्टरांनी आपल्या हाताखाली मदतनीस म्हणून ठेवलेली आठवी, दहावीचे शिक्षण घेतलेली मुलेही बिनधास्तपणे रुग्णांना इंजेक्शन व सलाईन लावतात ही गंभीर व धोकादायक बाब समोर येत आहे.
असे असले तरी यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे जिल्हा, तालुका व जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने एकाबाजूला रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात असून दुसरीकडे गरजू गोरगरिब रुग्णांची आर्थिक लूट करत आहेत. म्हणून या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मा. आरोग्यमंत्री, मा. जिल्हाधिकारी, मा. प्रांताधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी, तालुका व आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टर शोधून कारवाई करण्यासाठी संयुक्तपणे मोहीम राबवून कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे .