जागृत देवस्थान श्री. म्हसोबा बाबांची पुनर्स्थापना करतांना ठेकेदाराकडून धार्मिक भावनेला ठेच.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२५
शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत असून हे रुंदीकरण करतांना अंबे वडगाव ते मालखेडा दरम्यान पी. सी. के. कॉटन जिनिंग जवळ इतिहासकालीन श्री. म्हसोबा बाबांचे जागृत देवस्थान आहे. हे देवस्थान जुन्या रस्त्याच्या कडेला होते परंतु आता रस्त्याचे रुंदीकरण करतांना हे देवस्थान अडचणींचे ठरत होते. म्हणून या देवस्थानाला रस्त्याच्या कडेला जिथे वाहतूकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी त्या ठिकाणी श्री. म्हसोबा बाबांची पुनर्स्थापना करण्याचे व यासाठी लागणारा खर्च संबंधित ठेकेदाराने करावा असे अंबे ग्रामस्थांच्या वतीने एकमताने ठरवण्यात आले होते.
हा ठराव झाल्यावर संबंधित ठेकेदाराने श्री. म्हसोबा बाबांची पुनर्स्थापना करतांना ज्या धार्मिक विधी करुन पुनर्स्थापना करणे गरजेचे होते त्या सर्व विधी न करता श्री. म्हसोबा बाबांच्या मुर्तीं जे. सी. बी. च्या साह्याने खोदकाम करुन दुसरीकडे ठेवून दिल्या आहेत. तसेच आता ज्या जागेवर श्री. म्हसोबा बाबांची पुनर्स्थापना करण्याचे काम सुरु केले आहे ते काम थातुरमातुर पध्दतीने कोणताही धार्मिक विधी न करता करुन त्याठिकाणी श्री. म्हसोबा बाबांची पुनर्स्थापना करण्याचा घाट घातला असल्याने अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, कोकडी तांडा व वडगाव जोगे येथील ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याने वरील गावागावातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
म्हणून येत्या गुढीपाडव्याच्या दिवसांपूर्वी म्हणजे दिनांक ३० मार्च २०२५ रविवार पर्यंत चांगल्याप्रकारे ओटा बांधून श्री. म्हसोबा बाबांची विधिपूर्वक प्रतिष्ठापना करुन पुनर्स्थापना न केल्यास संबंधित ठेकेदारा विरुद्ध धर्मदाय आयुक्त, मा. जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार व पोलीस विभागाकडे रितसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सांगितले आहे.
कारण श्री. म्हसोबा बाबांचे हे देवस्थान इतिहासकालीन जागृत देवस्थान असून पंचक्रोशीतील गावागावांतील नागरिकांचे श्रध्दास्थान असून पंचक्रोशीतील नवरदेव लग्न लागण्याच्या अगोदर श्री. म्हसोबा बाबांचे दर्शन घेऊन त्याठिकाणी विधिवत पूजा करुन पानसुपारी ठेवून नंतरच बोहल्यावर चढतो, तसेच दसरा सणाला सगळ्यात अगोदर श्री. म्हसोबा बाबांची पुजा करुन त्याठिकाणी सोनं (आभेट्याची पाने) वाहिल्याशिवाय गावात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देत नाही, विशेष म्हणजे पोळा सणाला प्रत्येक पशुधन पालक आपले बैल, गाय यांना सजवून प्रथम श्री. म्हसोबा बाबांचे दर्शन घेतात नंतर पोळा सण साजरा करतात. तसेच गावात कुणीही चारचाकी किंवा दुचाकी वाहन आणल्यास सगळ्यात अगोदर श्री. म्हसोबा बाबांचे देवस्थानाला जाऊन त्याठिकाणी पुजा, विधी केल्याशिवाय वाहनाचा वापर करत नाही. अशा या श्रध्दास्थानाची चांगल्याप्रकारे पुनर्स्थापना करण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतील हजारो भाविक, भक्तांनी केली आहे.