बांबरुड राणीचे शिवारात बिबट्याच्या हल्यात गोऱ्हा ठार, शेतकरी वर्गात भितीचे वातावरण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२५
पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथील शेतकरी अशोक ओंकार डांबरे यांची खडकी शिवारातील तेली बल्डी जवळ गट नंबर ५१ ही शेतजमीन आहे. याच शेतात त्यांनी गुरेढोरे बांधण्यासाठी व्यवस्था केलेली असून याठिकाणी दोन बैल, तीन गायी, पाच वासरे व तीन गोऱ्हे बांधलेले होते. दिनांक १९ मार्च २०२५ बुधवार रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत तीन वर्षांच्या एका गोऱ्ह्याचा फडशा पाडला ही घटना घडल्याचे माहीत पडताच संबंधित शेतकऱ्यांने घटनास्थळी धाव घेतली असता बिबट्याच्या हल्यात तीन वर्षाचा गोऱ्हा ठार झाल्याचे दिसून आले.
ही घटना लक्षात येताच अशोक डांबरे यांनी पाचोरा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन रितसर पंचनामा केला तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन तो वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला असून संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे पंचवीस हजार रुपयांहून अधिक नुकसान झाले असल्याने त्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे. तसेच या शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून वनविभागाने या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.