वरखेडी गुरांच्या बाजारात बलवीरच्या करामती, फोन करताच मिळते खरेदीविक्री ची पावती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०३/२०२५
कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा अंतर्गत येणाऱ्या उपबाजार समिती वरखेडी येथील आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी भरणारा गुरांचा बाजार महाराष्ट्रातच नव्हे तर मध्यप्रदेश व गुजरात राज्यात प्रसिद्ध आहे. यामुळे या बाजारात मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून गुरेढोरे विक्री करण्यासाठी व विकत घेण्यासाठी मोठ्या संख्येने व्यापारी व शेतकरी येत असतात.
**************************************************
व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून दिलेली पावती,
**************************************************
आता नुकताच ऊसतोडीचा हंगाम संपल्यावर ऊस कारखान्याला गेलेले मजूर आपल्या बैलजोड्या घेऊन परत आले आहेत. तसेच शेती मशागतीची कामे आटोपली असल्याने शेतकरी त्यांच्या जवळ असलेल्या बैलांची खांदेपालट करण्यासाठी वरखेडी येथील गुरांच्या बाजारात आणत असल्याने गुराढोरांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे.
याचाच फायदा घेत या वरखेडी बाजारात येणाऱ्या गुराढोरांच्या व्यापाऱ्यांनी मार्केट कमिटीच्या एका कर्मचाऱ्याला हाताशी धरुन गुराढोरांची विक्री झाली तरीही कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियमानुसार ठरवून दिलेल्या मार्केट कमेटी प्रमाणे खरेदीविक्रीची पावती न करता थोडेफार पैसे घेऊन खरेदीविक्री झालेले पशुधन कृषी उत्पन्न उपबाजार समिती वरखेडीच्या बाजारातून बाहेर काढून देत असल्याने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
तसेच बुधवार व गुरुवार या दोन दिवसात गुरे बाजारात आणली जातात व गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा बाजार बंद होतो. हा बाजार बंद झाल्यानंतर बुधवार व गुरुवार रोजी गुरांच्या बाजारात आलेले पशुधन यापैकी खरेदीविक्री झालेले पशुधन याची मोजदाद होऊन सर्व लेखाजोखा त्याच दिवशी मुख्य कार्यालयात देणे बंधनकारक आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या वरखेडी येथील गुरांच्या बाजारात मागील सहा वर्षांपासून ठाण मांडून बसलेला बलवीर नावाचा कर्मचारी या पावती बुकांमध्ये हेराफेरी करुन पैसा कमावत असल्याची माहिती समोर येत आहे.
या मिळालेल्या माहितीनुसार बुधवार व गुरुवारी बाजारात येणाऱ्या पशुधनाची नोंद करुन गाय, म्हैस, बैलजोडीला दहा रुपये व शेळीला प्रत्येकी पाच रुपये प्रमाणे बैठक पावतीची रक्कम वसूल केली जाते. मात्र गुरेढोरांची बाजारात खरेदी, विक्री झाल्यानंतर शेतकरी व काही व्यापारी हे मार्केट कमिटीच्या नियमानुसार खरेदी, विक्रीची रक्कम भरुन पावती घेतात मात्र याच ठिकाणी मागील सहा वर्षांपासून ठाण मांडून बसलेला कर्मचारी व बऱ्याचशा बैल व्यापाऱ्यांची गट्टी जमली असल्याने गुरेढोरे विकत घेतली तरीही ती गुरेढोरे बैठक पावती दाखवून सोडली जातात अशी अशी खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
तसेच ही विना खरेदी विक्रीची पावती न घेता तसेच खेड्यापाड्यात जाऊन खरेदी केलेली गुरेढोरे चोरट्या मार्गाने वाहतूक करुन मोठ्या प्रमाणात कत्तली साठी नेली जातात व यातुन हे व्यापारी मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात विशेष म्हणजे बाजारातुन विकत घेतलेली परंतु खरेदी विक्रीची नोंद न केलेली तसेच खेड्यापाड्यातील परस्पर विकत घेतलेली गुरेढोरे कत्तलखान्यात नेत असतांना रस्त्यावर तैनात असलेले पोलीस किंवा सामाजिक संघटना या गुराढोरांच्या गाड्या अडवून विचारपूस करतात तेव्हा आम्ही ही गुरेढोरे विकत घेतली आहेत असे सांगितले जाते.
मात्र गुरेढोरे विकत घेतली आहेत असे सांगितले जात असले तरी त्यांच्याजवळ गुरेढोरे कोणत्या बाजारातून किंवा कुणाकडून घेतली याचा पुरावा मागितला असता थोडे थांबा आम्ही पावत्या मागवतो असे सांगून वरखेडी येथील गुरांच्या बाजारात कार्यरत असलेल्या बलवीर नावाच्या इसमाशी भ्रमणध्वनीवर संपर्क करुन त्याचक्षणी व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पावती मागवली जाते व केलेल्या सर्व अनाधिकृत कृत्यावर पावतीचे पांघरुण घालून ती गुरेढोरे कत्तलखान्यात रवाना केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
अशा नियमबाह्य पद्धतीने पावत्या दिल्या जात असल्याने मार्केट कमिटीचे उत्पन्न बुडत असून जातीवंत गुरोढोरे कत्तलखान्यात रवाना केली जात असल्याने वरखेडी गुरांच्या बाजारात सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत व या सहा वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी तपशील काढून त्वरित चौकशी करुन बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी पशुधन पालक व सुज्ञ नागरिकांनी केली जात आहे.