मुक्तानंद इण्डेन गॅस कंपनीच्या गॅस गोडाऊनला, वरखेडी पराड भागातील ग्रामस्थांचा विरोध.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०३/२०२५
वरखेडी येथील पराड परिसरातील मानव वस्तीमध्ये गॅस गोडाऊन बांधले जात असल्याने वरखेडी येथील पराड परिसरात रहात असलेल्या रहिवाशांनी याबाबत आक्षेप घेतला असून हे गॅस गोडाऊन त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी पराड परिसरातील नागरिकांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे मुक्तानंद इण्डेन गॅस ग्रामीण कंपनी असून या एजन्सीच्या माध्यमातून जवळपास पंधरा खेड्यापाड्यातील गावात स्वयंपाकाचा गॅस वितरीत केला जातो. असे असले तरी या गॅस कंपनीच्या संचालकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून वरखेडी ते पिंपळगाव हरेश्वर रस्त्यावर वरखेडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पराड परिसरात भरवस्तीत गॅस वितरण कार्यालय व गॅस गोडाऊन थाटले असून या भरवस्तीत उभारलेल्या गॅस गोडाऊन बाबत पराड परिसरातील रहिवाशांनी आक्षेप घेत हे गोडाऊन संबंधित विभागाकडून त्वरित हटवण्यात यावे अशी मागणी केली आहे.
याबाबत वरखेडी येथील पराड परिसरातील नागरिकांनी सांगितले की आम्ही या परिसरात दाटीवाटीने रहातो व येथील मानववस्तीतच मुक्तानंद इण्डेन गॅस कंपनीने गॅस गोडाऊन बांधले आहे. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस हंड्या ठेवण्यात येतील हे गॉस कंपनीच्या नियमानुसार चुकीचे आहे. वास्तविक पाहता गॅस सिलिंडर हे मानव वस्तीपासून लांब पाहिजे परंतु संबंधित मुक्तानंद इण्डेन गॅस कंपनीच्या व्यवस्थापकांनी नियमांची पायमल्ली केली आहे.
यामुळे भविष्यात एखाद्यावेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता टाळता येत नाही. तसेच या गॅस गोडाऊन वर तसेच जवळच असलेल्या वितरण कार्यालयात दिवसरात्र गॅस सिलिंडरची उचलपटक केली जाते व कंपनीकडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर आणले जातात तेव्हा ते सिलिंडर खाली उतरवतांना ट्रक मधून वरुनच फेकले जातात तसेच येथून सिलिंडर बाहेरगावी नेण्यासाठी इतर वाहनात भरतांना ही फेकझोक केली जाते याचा मोठमोठ्याने सतत आवाज येतो.
यामुळे दिवसभर शेतात कामकरुन आलेले शेतकरी व शेतमजूरांना तसेच जेष्ठ नागरिक व लहान, लहान मुलाबाळांना या आवाजाने त्रास होतो व आरामाची झोप घेता येत नसल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊन मानसीक व शारीरिक ताण सहन करावा लागत आहे. तसेच गॅस सिलिंडरांची फेकझोक करतांना एखाद्यावेळी सिलिंडर मधून गॅस गळती झाल्यास किंवा गॅस गोडाऊन मध्ये गॅस गळती झाल्यास मानव वस्तीतील रहिवाशांच्या जीविताला धोकादायक ठरु शकते म्हणून हे गॅस गोडाऊन त्वरित मानव वस्तीपासून लांब हलवण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.
************************************************
वरखेडी ग्रामपंचायतीकडून नाहरकत न घेताच भरवस्तीत गॅस गोडाऊन बांधलेच कसे ?
************************************************
वरखेडी येथील पराड परिसरात मुक्तानंद इण्डेन गॅस गोडाऊन व गॅस वितरण कार्यालय उभारण्यात आले आहे. याला वरखेडी येथील पराड परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेतला असून हे गॅस गोडाऊन इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन सत्यजित न्यूजच्या माध्यमातून वरखेडी येथील पराड परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित मुक्तानंद इण्डेन गॅस कंपनीच्या संचालकांशी संवाद साधला असता समर्पक उत्तर दिले नाही.
म्हणून याबाबत वरखेडी गृप ग्रामपंचायतीच्या सरपंचांना याबाबत माहिती विचारली असता आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या मुक्तानंद इण्डेन गॅस कंपनीच्या गोडाऊन बांधण्यासाठी आमच्याकडे परवानगी घेण्यासाठी अर्ज आलेला नाही व आम्ही
कोणत्याही प्रकारची परवानगी (नाहरकत दाखला) दिलेला नसल्याचे सांगितले आहे. म्हणून ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या अनाधिकृतपणे उभारण्यात आलेल्या गॅस गोडाऊन बद्दल चौकशी करुन हे गॅस गोडाऊन मानव वस्तीपासून लांब दुसरीकडे हलविण्यासाठी संबंधित गॅस कंपनीच्या संचालकांना समज द्यावी अशी मागणी केली जात आहे.