पाचोरा, भडगाव, जामनेर, सोयगाव तालुक्यात सुरु असलेली वृक्षतोड थांबवणार कोण ?

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०३/२०२५
(भारताला पाचशे करोड वृक्षांची गरज आहे. वेळीच जागे व्हा नाहीतर पाठीवर ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरावे लागेल.)
एकीकडे झाडे लावा झाडे जगवा, हे उपक्रम राबविले जात आहेत, तर दुसरीकडे मात्र आधुनिक सोयी, सुविधेसाठी याच झाडांवर सपासप कुऱ्हाड चालवली जात आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार, गेल्या पाच वर्षात देशात फक्त महामार्ग बांधण्यासाठी जवळपास ५७.१० लाख झाडे तोडण्यात आली. महाराष्ट्रात २.८९ लाख झाडांच्या कत्तली करण्यात आल्या आहेत. व विकास कामांमध्ये लाखो वृक्षांची कत्तल केली गेली आहे व आता याचा पर्यावरणावर परिणाम होताना दिसत आहे.
पाचोरा, भडगाव, जामनेर व सोयगाव तालुक्यासह खेड्यापाड्यात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून या चारही तालुक्यातील राखीव जंगल, शेती शिवार, गायरान जमीन व गावकुसात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असून ही वृक्षतोड करतांना आंबा, निंब, पिंपळ, खैर व इतर जातीच्या झाडांची स्वयंचलीत यंत्राच्या साह्याने खुलेआम, दिवसाढवळ्या कत्तल करुन या कत्तल केलेल्या झाडांची लाकडे लोहार, शेंदुर्णी, जामनेर, सोयगाव, पाचोरा येथील लाकुड वखारीत पाठवण्यात येत आहेत.
तसेच काही बाहेरगावच्या लाकुड व्यापाऱ्यांनी पाचोरा, भडगाव, जामनेर, सोयगाव तालुक्यात धुमाकूळ घातला असून हे लाकूड व्यापारी हिरवीगार झाडे कापून ही लाकडे जंगलात मोठ, मोठे ढिगारे घालून लपवून ठेवत आहेत व आठ ते दहा ट्रक भरतील इतकी लाकडे जमवून ही लाकडे मोठे १६ टायरचे ट्रक भरुन चोरट्या मार्गाने वाहतूक करुन तर कधी, कधी महसूल, पोलीस व वनविभागाच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समोर नाकावर टिच्चून दिवसाढवळ्या खुलेआम वाहतूक करतांना दिसून येत आहेत.
************************************************
वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व लाकुड व्यापाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे खात्रीलायक वृत्त.
***********************************************
पाचोरा, भडगाव, जामनेर व सोयगाव जामनेर तालुक्यात लाकुड व्यापाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून दररोज शेकडो हिरव्यागार वृक्षांचा कत्तल केली जाते व हे लाकूड ट्रक व ट्रॅक्टर मध्ये भरुन खुलेपणाने वखारीत वाहून नेतांना सगळ्यांना दिसते मात्र ही लाकडांची होणारी वाहतूक वनविभागाचे जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना कशी दिसत नाही असा खडा सवाल निसर्गप्रेमी व जनमानसातून विचारला जात आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता लाकुड व्यापारी व वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांचे अर्थपूर्ण सलोख्याचे संबंध असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हे लाकूड व्यापारी वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरमहा ठराविक रक्कम देऊन खुष ठेवतात. तसेच लाकडाने भरलेले ट्रॅक्टर व ट्रक वजन करण्यासाठी ज्या वजन काट्यावर जाते त्याच ठिकाणी वजनकाटा करणाऱ्या मापाड्याजवळ प्रती ट्रॅक्टर ४००/०० रुपये व प्रती ट्रक वजनानुसार १०००/०० ते १५००/०० रुपये लाकुड व्यापाऱ्यांकडून घेऊन जमा केले जातात व नंतर ते वनविभागाचे हप्तेखोर अधिकारी व कर्मचारी घेऊन जातात असे खात्रीलायक वृत्त जनमानसातून ऐकावयास मिळते आहे.
हा प्रकार पाहून निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण एका बाजूला ४० डिग्री सेल्सिअस पासून तापमान वाढत चालले असून ४५ डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानात वाढ होतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे राखीव जंगल, शेती शिवार, गायरान जमीन व गावकुसात दररोज मोठ्या हिरव्यागार हजारो वृक्षांची कत्तल केली जात आहे. यामुळे वातावरणातील तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून हवेतील ऑक्सिजनचे प्रमाणात व ओझोन वायूचा स्थर झपाट्याने कमी होत असल्याने कधी उन्हाळ्यात पावसाळा तर कधी पावसाळ्यात उन्हाळा असा निसर्गात बदल होतांना आपण अनुभवत आहोत.
*************************************************
विकास कामांमध्ये दररोज हजारो हिरव्यागार वृक्षांचा बळी.
*************************************************
संपूर्ण देशासह महाराष्ट्रात होणारे नवनवीन महामार्ग, रेल्वेमार्ग, मोठ, मोठे प्रकल्प, मोठ, मोठे कारखाने व मानवी वस्त्यांचे विस्तारीकरण करण्यासाठी दररोज हजारो एकर शेतजमीनीचे बिगरशेती मध्ये रुपांतर केले जात असल्याने या जमिनीवर असलेली वनसंपदा झपाट्याने नष्ट होत आहे म्हणून भविष्यात आपल्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली असून ही होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न होणे गरजेचे असून यात सर्व नागरिकांनी स्वताहून हिरीरीने भाग घेऊन वृक्षसंवर्धन व वृक्षलागवड करणे अत्यंत गरजेचे आहे.
************************************************
मा. जिल्हाधिकारी, मा. प्रांताधिकारी, मा. तहसीलदार साहेबांनी लक्ष देण्याची गरज.
************************************************
या होणाऱ्या अवैध वृक्षतोडीकडे मा. जिल्हाधिकारी मा. प्रांताधिकारी मा. तहसीलदार साहेबांनी जातीने लक्ष घालून होणारी वृक्षतोड त्वरित थांबवावी तसेच वनविभागाचे भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांसह हिरव्यागार वृक्षांची विक्री करणाऱ्या व्यक्तींविरोधात कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.