खाजगी फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधींकडून कर्जदाराला जीवे मारण्याची धमकी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०३/२०२५
सद्यस्थितीत वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या बाजारात उतरल्या असून या कंपन्या आधारकार्ड, पॅनकार्ड घेऊन वाहन खरेदी तसेच मोबाईल, इतर सुखवस्तू घेण्यासाठी तसेच वैयक्तिक किंवा व्यावसायीक कर्ज मासिक हप्त्यात देत आहेत.
हे खाजगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या तारखेपर्यंत दरमहा हप्ते भरणे क्रमप्राप्त आहे. तसेच महिन्याच्या दिलेल्या तारखेपर्यंत कर्जाची रक्कम न भरल्यास त्या कर्जदाराला ५००/०० रुपये दंडाची रक्कम आकारली जाते व हप्त्याची रक्कम अधिक दंडाची रक्कम असी वसूली केली जाते. मात्र एखाद्या कर्जदाराला वेळेवर पैसे भरण्यासाठी अडचण आल्यास या खाजगी कंपनीचे वसुली प्रतिनिधी हे संबंधित कर्जदाराला वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क करुन किंवा संदेश पाठवून कर्ज भरण्यासाठी भाग पाडतात यामुळे कर्जदाराला मानसिक ताण सहन करावा लागत आहे.
वास्तविक पाहता हप्ता थकल्यावर कर्जदाराला ५००/०० रुपये दंड आकारण्यात आल्यावर त्याला हप्त्याची रक्कम भरण्यासाठी एक महिना सवलत दिली पाहिजे कारण संबंधित खाजगी कंपनीकडून कर्जदाराला ५००/०० दंड आकारलेला असतो परंतु हे खाजगी कंपनीचे वसुली प्रतिनिधी कर्ज वसुली करण्यासाठी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधुन कर्जदाराला जेरीस आणतात.
परंतु आज एका खासगी कंपनीच्या वसूली प्रतिनिधीने कहरच केला व संबंधित वसुली प्रतिनिधीने वरखेडी येथील एका कर्जदाराच्या घरासमोर जाऊन त्याची पत्नी व त्याच्या लहान, लहान मुलांसमोर हमरीतुमरीची भाषा करत घरातील भांडीकुंडी घेऊन जाण्याची धमकी दिली संबंधित वसुली प्रतिनिधी लहान, लहान मुलांसमोर धमकी देत असल्याने ती घाबरली होती म्हणून संबंधित कर्जदाराने तुम्हाला मी पैसे देतो माझ्या सोबत चला असे सांगून वरखेडी येथील बाजारपेठेत जाऊन मित्रांकडून दोन हजार रुपये उसनवार घेऊन वसुली प्रतिनिधीला पैसे दिले.
मात्र हप्त्याची रक्कम जास्त असल्याने राहिलेली रक्कम केव्हा देणार यावरुन वसुली प्रतिनिधीने कर्जदाराशी वाद घातला व हप्त्याची रक्कम न दिल्यास तुला पाहून घेईल तु फक्त पाचोरा शहरात सापड मग बघ तुझे कसे हाल करतो, तुझा हातपाय तोडतो अशी धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.
संबंधित वसुली प्रतिनिधीने लहान, लहान मुले व पत्नी समोर भर बाजारपेठेत धमकी दिल्यामुळे संबंधित कर्जदार कुटुंब भयभीत झाले असून वसुली प्रतिनिधीने धमकी दिल्याने जीविताला धोका निर्माण झाला असल्याने कर्जदाराची पत्नी लवकरच पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.