ऐकाव ते नवलच, पाचोरा तालुक्यात औषध विक्रेतेही करतात काउंटर प्रॅक्टीस.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०३/२०२५
पाचोरा शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांवर बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करुन सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळत आहेत. याबाबत सत्यजित न्यूजच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवण्यात आला मात्र जिल्हा, तालुका व मोठमोठ्या गावातील शासकीय रुग्णालयात नियुक्त असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून याकडे मुद्दाम जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत असून आजही पाचोरा शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत.
हा प्रकार येथेच थांबत नाही तर अजून एक नवीन बाब समोर आली असून पाचोरा शहरासह तालुक्यातील काही मान्यताप्राप्त औषध विक्रेतेही डॉक्टरांचा सल्ला न घेता गरजू रुग्णांना फक्त लक्षणे विचारुन त्या लक्षणांवरून गोळ्या, औषधे देऊन उपचार करत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून काही औषध विक्रेत्यांनी तर कहरच केला व सर्व कायदे धाब्यावर बसवून चक्क औषधे विक्रीच्या दुकानात (मेडीकल स्टोअर्स मध्येच) सलाईन लावत असल्याचे छायाचित्र व चित्रफिती सत्यजित न्यूजच्या हाती लागली आहेत.
तसेच औषधे विक्रीच्या दुकानाची मांडणी करतांना शासकीय नियमाप्रमाणे पाहिजे असल्यास चौरस मीटर क्षेत्रफळाची नियमावली न पाळता काही औषध विक्रेत्यांनी छोट्या, छोट्या पत्र्याच्या टपरीवजा जागेत औषध विक्रीचे (मेडीकल स्टोअर्स) सुरु केले असल्याचे दिसून येत असून यामुळे वातावरणातील बदलामुळे टॉनिक्स, लहान मुलांचे व्हिटॅमिन ड्रॉप तसेच व्हिटॅमिन सिरप व इंजेक्शन परिणाम होऊन त्या औषधांचे गुणधर्म कमी होतात व तीच औषधे विक्री केली जात असल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे.
तसेच बऱ्याचशा औषधी दुकानाचे संचालक मेडीकल स्टोअर्समध्ये न थांबता आठवी, दहावी पास झालेल्या मुलांना कामावर ठेऊन ते औषध विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या शैलीत लिहिलेली औषधे देवतांना औषधांची नावे समजत नसल्याने म्हणजे स्पेलिंग लक्षात येत नसल्याने “त म्हणजे तपेले” समजून औषधे देऊन मोकळे होत आहेत. तसेच बरेचसे औषध विक्रेते जास्त पैसे कमावण्यासाठी मुंबई मार्केट औषधे विकत आहेत.
म्हणून या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका शल्यचिकित्सक, अन्न व औषध प्रशासनाने लक्ष गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.