पाचोरा तालुक्यातील धरण व पाझर तलावातून पाणी उपसा सुरुच, पाटबंधारे विभाग व विद्युत वितरण कंपनीकडून अर्थपूर्ण डोळेझाक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०३/२०२५
पाचोरा तालुक्यातील लहानमोठे धरण, पाझर तलाव व सार्वजनिक जलस्रोत असलेल्या जलसाठ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरु असल्याचे दिसून येत असून हा पाणी उपसा असाच सुरु राहील्यास धरण व पाझर तलावातून ज्या, ज्या गावांना पाणीपुरवठा केला जातो अशा गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट येऊ शकते अशी भीती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली असून हा होणारा पाणी उपसा त्वरित बंद करण्यासाठी पाटबंधारे व संबंधित जबाबदार असलेल्या विभागाकडून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावागावाती नागरिकांनी केली आहे.
**************************************************
मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?
**************************************************
पाचोरा तालुक्यातील धरण, पाझर तलाव व सार्वजनिक जलस्रोतातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरु असून हा पाणी उपसा करण्यासाठी बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग व विद्युत वितरण कंपनीकडून रितसर परवानगी घेतली आहे तर जास्तीत, जास्त शेतकऱ्यांनी कोणतीही परवानगी न घेताच रात्रंदिवस विद्युत चोरी सह पाणी चोरी करत असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
मात्र हा पाणी उपसा असाच सुरु राहील्यास पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा धरण, पाझर तलावातील जलसाठा झपाट्याने कमी होऊन भविष्यात खेड्यापाड्यांवर पाणी टंचाईचे संकट येऊ शकते म्हणून हा पाणी उपसा त्वरित थांबवण्यात यावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे. कारण मार्च महिन्यातच बऱ्याचशा गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची जलपातळी झपाट्याने कमी होत चालली असून बऱ्याचशा गावांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.
तसेच भविष्यात वेळेवर पावसाला सुरुवात झाली तरी जवळपास येणाऱ्या २० जून पर्यंत धरण व पाझर तलावात नव्याने जलसाठा होणे शक्य नाही म्हणून हा पाणी उपसा त्वरित थांबवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नाहीतर पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा खेड्यापाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच गुराढोरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध रहाणार नसल्याने आहे तो जलसाठा कसा टिकवता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
तसेच धरण, पाझर तलाव व सार्वजनिक जलस्रोतातून होणारी पाणी चोरी थांबविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी सगळ्यांची इच्छा आहे परंतु ‘मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार’ या विषयावर कोणीही पुढे यायला तयार नाही परंतु पाटबंधारे विभाग व विद्युत वितरण कंपनीकडून या पाणी चोरीकडे जाणूनबुजून अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप जनमानसातून केला जात असून ही पाणी चोरी थांबविण्यासाठी मा. प्रांताधिकारी, मा. तहसीलदार यांनी लक्ष घालून पाणी उपसा थांबविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी मागणी केली जात आहे.