वरखेडी येथील विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी ? पोलीसांच्या भुमिकेकडे जनतेचे लक्ष.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२५
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील एका २७ वर्षीय विवाहितेने एका खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ गुरुवार रोजी उघडकीस आली असून संबंधित महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये स्वताच्या आवाजात एक संदेश ध्वनी मुद्रित करुन तसेच एक पत्र म्हणजे (तक्रारी अर्ज) चिठ्ठी लिहून त्या तक्रारी अर्जात संबंधित इसमाच्या नावाचा उल्लेख करुन आत्महत्या केली असल्याची बाब उघडकीस आली असून या घटनेमुळे वरखेडी परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच आरती पाटील हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयत आरतीच्या सासरच्या, माहेरच्या नातेवाइकांसह वरखेडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
मयत आरतीचा मृतदेह तिच्याच शेतातील विहिरीत आढळून आल्यानंतर वरखेडी गावचे पोलीस पाटील बाळू कुमावत यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी घटनास्थळी येऊन मयत आरतीचा मृतदेह विहिरीतून काढून उत्तरिय तपासणीसाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन आरतीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. प्रकाश काळे व त्यांचे सहकारी करत आहेत.
मात्र आरती हिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात (चिठ्ठीत) व स्वताच्या मोबाईलमध्ये, स्वताच्या आवाजात एक ध्वनिफिती तयार केली असून यामध्ये सॅटीन क्रेडिट केअर नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या कार्यालयातील प्रिन्स कुमार, कपिल वाडपत्रे व आकाश कुऱ्हेकर यांच्या नावाचा उल्लेख व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नमूद केले असून यात सॅटीन क्रेडिट फायनान्स कंपनीचा अमरावती येथील परंतु चाळीसगाव कार्यालयात रिजनल मॅनेजर म्हणून काम पहात असलेल्या आकाश विजय कुऱ्हेकर याने माझी मर्जी नसतांना बळजबरी माझ्यावर अत्याचार केले व नंतर सतत ब्लॅकमेल करुन त्रास देत होता याच कालावधीत यांच्यासोबत असलेले प्रिन्स कुमार व कपिल वाडपत्रे यांनीही आरती सोबत गैरवर्तन केले असल्याचे नमुद करत या तिघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
कारण आरती सोबत गैरकृत्य केल्यानंतर संबंधित त्रिकुटाने आरतीचा छळ करणे सुरुच ठेवले होते म्हणून आरतीने पोलीसात तक्रार करणार असल्याचे सांगितले होते म्हणून या त्रिकुटाने वरिष्ठांना सांगुन आरतीला कामावरुन काढून टाकले होते तरीही आकाश कुऱ्हेकर, प्रिन्स कुमार व कपिल वाडपत्रे हे भ्रमणध्वनीवर आरतीला धमक्या देऊन चित्रफिती सोशल मीडियावर टाकून बदनामी करु अशा धमको देत होते व या छळाला कंटाळून आरतीने टोकाचा निर्णय घेतला व दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ बुधवार रोजी घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून जात पी. जे. रेल्वे लाईन जवळ असलेल्या स्वताच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
ही घटना घडल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रितसर पंचनामा करुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याने याची दखल घेऊन सत्यजित न्यूजच्या माध्यमातून याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची कुणकुण लागल्याने संबंधित त्रिकुटाने चाळीसगाव कार्यालयातून पळ काढला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याची शहानिशा करण्यासाठी सत्यजित न्यूज कडून मयत आरती हिने लिहिल्या चिठ्ठीतील प्रिन्स कुमारचे भ्रमणध्वनी क्रमांक ७४००५२९१४५, ९९९९८४४७१४, कपिल वाडपत्रे याचा भ्रमणध्वनी क्रमांक ८४२१७६०७१८ व मुख्य संशयित आरोपी आकाश कुऱ्हेकर याचे भ्रमणध्वनी क्रमांक ७७०१९१५४८१, ८६२४९७५७६१ या कार्यक्रमांवर संपर्क केला असता त्याचे भ्रमणध्वनी बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
म्हणून आम्ही चाळीसगाव शहरातील काही सुज्ञ नागरिकांशी संपर्क साधून सॅटीन क्रेडिट फायनान्स कंपनीच्या कार्यालयात काय परिस्थिती आहे याबाबत जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता मयत आरतीने चिठ्ठीत नमुद केलेले त्रिकूट चाळीसगाव शहरातून रफुचक्कर झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र असे असले तरी मात्र पिंपळगाव हरेश्वर पोलीस या घटनेबाबत पुढे काय कारवाई करणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून मयत आरतीच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले आकाश कुऱ्हेकर, प्रिन्स कुमार व कपिल वाडपत्रे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.