पिंपळगाव हरेश्वर येथील गौण खनिज चोरट्यांना राजकीय पाठबळ, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची रात्रभर धावपळ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०२/२०२५
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील गायरान जमिनीवर काही जे. सी. बी. व ट्रॅक्टर मालक सुटीचा दिवस असल्याने दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोजी रात्री जे. सी. बी. च्या साह्याने खोदकाम करुन जवळपास पंधरा ट्रॅक्टर भरधाव वेगाने गल्लीबोळातून पळवून मोठ्या प्रमाणात मुरम व मातीची वाहतूक करत होते. यामुळे पिंपळगाव हरेश्वर येथील रस्त्यावर घरे असलेल्या नागरिकांना या ट्रॅक्टरच्या आवाजाने त्रास होत होता तसेच अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती ही परिस्थिती पाहून काही सुज्ञ नागरिकांनी गायरान जमिनीवर खोदकाम करणाऱ्या जे. सी. बी. व मुरुम, मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची चित्रफीत व छायाचित्र व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून सत्यजित न्यूजकडे पाठवून गायरान जमिनीवर होणारे अवैध उत्खनन व गौण खनिज चोरी थांबवण्याची मागणी केली होती.
याची दखल घेऊन सत्यजित न्यूज कडून लगेचच म्हणजे दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोजी रात्री “पिंपळगाव हरेश्वर येथील गायरान जमीनीवर जे. सी. बी. च्या साह्याने खोदकाम करुन गौण खनिजाची चोरी कारवाईची मागणी” या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिध्दीस दिले होते. याची दखल घेऊन मा. तहसीलदार साॊ. पाचोरा यांनी मंडल अधिकारी मा. डहाके व पिंपळगाव हरेश्वर सजेचे तलाठी मा. तडवी आप्पा यांना घटनास्थळी जाऊन सत्यता पडताळून कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते अशी माहिती समोर येत असून या आदेशानुसार मंडल अधिकारी मा. डहाके व तलाठी मा. तडवी आप्पा यांनी पिंपळगाव हरेश्वर येथील गायरान परिसरात जाऊन त्याठिकाणी उत्खनन करणारा जे. सी. बी. व मुरुम, मातीची वाहतूक करणारे काही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस स्टेशनला नेत होते.
याच वेळी जे. सी. बी. मालक व काही ट्रॅक्टर मालकांनी पिंपळगाव हरेश्वर येथील काही प्रतिष्ठित लोकांना हाताशी धरुन संबंधित अधिकाऱ्यांवर दबावतंत्र वापरुन जे. सी. बी. वर बसलेले मंडल अधिकारी मा. डहाके व ट्रॅक्टरच्या मागे, मागे दुचाकीवरुन जात असलेले तलाठी मा. तडवी आप्पा यांच्याशी हुज्जत घालून मंडल अधिकारी मा. डहाके यांना जे. सी. बी. वरुन खाली उतरण्यासाठी भाग पाडले व त्या ठिकाणाहून जे. सी. बी. ट्रॅक्टर पळवून नेल्याने गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणारे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
परंतु जे. सी. बी. व ट्रॅक्टर तसेच संबंधित अधिकारी यांचा वादसंवाद सुरु असतांना व संबंधित अधिकारी जे. सी. बी. वर बसलेले असतांना व नंतर रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावर उतरत असतांना काही सुज्ञ नागरिकांनी छायाचित्रे व चित्रफिती मोबाईल मध्ये घेऊन ते सत्यजित न्यूजकडे पाठवले आहेत. म्हणून दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोजी सत्यजित न्यूजने दिलेल्या वृत्ताचा खुलासा घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला परंतु संबंधित अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई का केली नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
म्हणून पिंपळगाव हरेश्वर येथील गायरान जमिनीवर होणारे उत्खनन व गौण खनिज वाहतूक कायमस्वरूपी थांबवून गायरान जमीन वाचवण्यासाठी तसेच आजपर्यंत झालेले गौण खनिज उत्खनन व चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पिंपळगाव हरेश्वर येथील काही सुज्ञ नागरिक लवकर मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
*पुढील भागात पिंपळगाव हरेश्वर गावाला जवळपास दिडशे हेक्टर गायरान जमिनीची नैसर्गिक देणगी मिळाली असून या गायरान जमिनीवर वृक्षलागवड किंवा अन्य प्रकल्प का राबवण्यात येत नाहीत तसेच या गायरान जमिनीवर अनाधिकृतपणे उत्खनन करुन मुरुम, माती गौण खनिजाची दिवसाढवळ्या चोरी केली जात असतांनाही ग्रामपंचायत बघ्याची भूमिका का घेत आहेत याबाबत पिंपळगाव हरेश्वर गावाचे सरपंच यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन पाठपुरावा करण्यात येणार आहे*
मा. मंडल अधिकारी व मा. तलाठी यांच्या गोलमाल भूमिकेबद्दल सविस्तर वृत्त लवकरच*