गाळण येथील ऊसतोड मजूराच्या अकरा वर्षीय मुलीचा रणगाव येथे संशयास्पद मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०२/२०२५
पाचोरा तालुक्यातील गाळण येथील ऊसतोड मजूर कैलास रमेश राठोड यांच्या अकरा वर्षीय मुलीचा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रणगाव येथील शेत शिवारातील एका विहिरीत मृतदेह आढळून आला असून या घटनेबाबत वालचंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास दशरथ निर्मल हे करीत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील गाळण येथील कैलास रमेश राठोड, त्यांची पत्नी सौ. रंजना राठोड व मुलगी कु. सलोनी वय वर्षे ११ हीला सोबत घेऊन पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मौजे रणगाव येथील आनंदराव मारुती साळुंखे यांच्याकडे दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ पासून ऊसतोडणीचे काम करत आहेत. हे ऊसतोडणी चे काम करत असतांना दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी नियमितपणे सकाळी सहा वाजता कैलास पत्नी सौ. रंजना हे त्यांची मुलगी कु. सलोनी हीला त्याच्या कुपीवर (उसाचे पाचट इतर साहित्यापासून बनवलेल्या झोपडीत घरचे काम करण्यासाठी सोडून गेले होते.
कैलास व त्याची पत्नी सौ. रंजना यांनी दिवसभर ऊसतोडणीचे काम करुन सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या कुपीवर परत आले त्यांनी सलोनीला कुपीमध्ये पाहीले परंतु सलोनी कुपीमध्ये किंवा आसपास दिसून न आल्यामुळे ती शेतात कुठे आसपास असेल म्हणून त्यांनी तीला आरोळ्या मारुन बोलावण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही सलोनी ही कुठेही मिळून नाही. म्हणून त्यांनी जवळच असलेले ऊसतोड मजुरांचे ठेकेदार आनंदराव साळुंखे यांच्या घरी पाणी घेण्यासाठी गेली असावी असे समजून ते ठेकेदार आनंदराव साळुंखे यांच्या घरी जाऊन सलोनी तुमच्या घरी आली आहे का ? याबाबत विचारले असता सलोनी आमच्या घरी आली नसल्याचे ती कुठे आहे हे आम्हाला माहीत नसल्याचे आनंदराव साळुंखे यांच्या घरच्यांनी सांगितले.
सलोनी ठेकेदार आनंदराव साळुंखे यांच्या घरी आढळून न आल्याने सलोनीचे वडील कैलास राठोड व सलोनीची आई रंजना राठोड यांनी सलोनीची शोधाशोध सुरु केले व त्यांच्याच कुपीजवळ त्यांच्याच सोबत ऊसतोडणीच्या कामासाठी आलेल्या त्यांच्याच गावाच्या कमळाबाई संजय चव्हाण यांच्याकडे सलोनी बद्दल विचारपूस केली असता सलोनी ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरीच म्हणजे कुपीवर घरातील कामे करत होती असे सांगितले व नंतर ती कुठे गेली हे मला माहीत नाही असे कमलाबाई चव्हाण यांनी सलोनीच्या आईवडीलांना सांगितले म्हणून सलोनीच्या आई, वडीलांनी कुपीच्या आसपास शेतात व रणगाव परिसरात सलोनीचा शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने सलोनीचे वडील व आई यांना खात्री झाली की सलोनीला कुणीतरी तीच्या अल्पवयाचा व अज्ञानतेचा फायदा घेत वाईट हेतूने तीला फुस लाऊन पळवून नेले असावे अशी दाट शंका आली व खात्री झाली.
म्हणून त्यांनी जवळच असलेल्या वालचंदनगर पोलीस स्टेशनला जाऊन सलोनी हीला आम्ही घरी नसल्याचा तीच्या अल्पवयाचा फायदा कुणीतरी अज्ञात इसमाने वाइट हेतूने किंवा कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे अशी अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली होती. ही फिर्याद दाखल झाल्यापासून वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी तसेच सलोनीचे आईवडील सलोनीची शोधाशोध करत असतांनाच घटनेच्या चौथ्या दिवशी वालचंदनगर पोलीसांना कैलास राठोड यांच्या शेतातील कुपीजवळ असलेल्या शेतातील एका पडिक विहीरीत सलोनीचा मृतदेह आढळून आला आहे.
सलोनीचा मृतदेह आढळून आल्यानंतर वालचंदनगर पोलीसांनी घटनास्थळी रितसर पंचनामा करुन सलोनीचा मृतदेह तीच्या आईवडीलांच्या ताब्यात दिला व तदनंतर पाचोरा तालुक्यातील गाळण येथे राहत्यागवी सलोनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून आमच्या मुलीला कुणीतरी वाईट हेतूने फुस लाऊन घेऊन जात तिच्यासोबत गैरकृत्य केले असावे असा संशय सलोनीचे वडील कैलास राठोड व आई सौ. रंजना राठोड यांनी व्यक्त केला असून या घटनेबाबत सखोल चौकशी करुन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्ही मंत्रालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.