पत्रकार हो वृत्त संकलन करतांना जरा सांभाळून, नाहीतर लबाड लांडगे घेतील तुम्हालाच खोट्या गुन्ह्यात गुंडाळून.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०२/२०२५
सद्यस्थितीत सगळीकडे सर्वप्रकारचे अवैध धंदे, लकुड माफिया, रेशन माफिया, गौण खनिज माफिया, वाळू माफिया तसेच मादक पदार्थ विक्री, अवैध दारु विक्री, जुगाराचे अड्डे, ऑनलाईन जुगार असे बरेचसे अवैध धंदे दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरु असल्याने सगळीकडे अराजकता माजली असून हे अवैध धंदे करणारांना कुणाचे ना कुणाचे पाठबळ मिळत असल्याने “सत्तेपुढे शहाणपण चालत नसल्याने” इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावणारे काही कायद्याचे रक्षक हतबल झाले आहेत तर काहींनी इच्छा नसतांनाही “पाण्यात राहून माश्याशी वैर नको” म्हणून आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत आपल चांगभलं करुन घेत आहे त्या परिस्थितीला सामोरे जात असल्याचे दिसून येते.
यामुळे सगळीकडे दररोज जबरी चोरी, दरोडा, रस्ता लूट, मारामाऱ्या, दिवसाढवळ्या चाकु हल्ला, खुन, बलात्कार, छेडखानी, अपहरण, लूटमार अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून सर्वसामान्य नागरिक व विशेष करुन महिलावर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ही परिस्थिती पाहून काही जागरुक नागरिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटून वरिल गैरप्रकारांच्या विरोध आवाज उठवत आहेत तर काही जागरुक पत्रकार आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून शोध पत्रकारितेच्या माध्यमातून शासन, प्रशासनाला जाणीव करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
परंतु समाजहितासाठी लिहितांना किंवा आलेल्या तक्रारींची दखल घेऊन वृत प्रकाशित केल्यानंतर अवैध धंदे करणाऱ्यांकडून संबंधित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कचाट्यात पकडून कोणत्या ना कोणत्या प्रकारे खोटे गुन्हे दाखल करुन एकप्रकारे त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे व यात स्वताला प्रतिष्ठीत समजून घेणारे काही लोक व कायद्याचे काही भ्रष्ठ अधिकारी व कर्मचारी पडद्याच्या मागुन साथ देत असल्याने या गैरप्रकारामुळे सद्यस्थितीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीवर खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
म्हणून “पत्रकार हो वृत्त संकलन करतांना जरा सांभाळून, नाहीतर लबाड लांडगे घेतील खोट्या गुन्ह्यात गुंडाळून” अशी सुचना देण्याची वेळ आली आहे.