संबंधित ठेकेदाराकडून चोळले जातेय वाहनधारकांच्या जखमेवर मीठ, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुरुम व मातीचा वापर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०२/२०२५
पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामाला मंजुरी मिळाली असून काही महिन्यात या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने रस्त्यावरुन वाहन चालवतांना रस्त्यावर खड्डे पडले आहेत की खड्ड्यात रस्ता गेला आहे असा विचार करण्याची वेळ वाहनधारकांवर आली असून रस्त्याचे कामाला सुरुवात होईपर्यंत या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे. कारण या रस्त्यावरुन वाहने चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत असून हे खड्डे चुकवण्याच्या नादात दररोज लहानमोठे अपघात होऊन या अपघातात दररोज बरेचसे वाहनधारक जखमी होत असल्याने वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित ठेकेदार खड्डे बुजवण्यासाठी मोठ्या अपघाताची वाट तर पहात नाही ना असा प्रश्न संतप्त झालेल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तर दुसरीकडे पाचोरा ते वरखेडी रस्त्यावर पडलेले खड्डे तात्पुरते बुजवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असल्याची माहिती समोर येत असून संबंधित ठेकेदार मात्र खड्डे बुजवण्यासाठी चक्क मुरुम व मातीचा वापर करत असल्याने एका बाजूला मुरम व मातीने खड्डे बुजवून झाल्यावर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असल्याने दुसरीकडे खड्ड्यात टाकलेला मुरुम व माती काही वेळातच नाहीसी होऊन पुन्हा खड्डे जैसे थे रहात असल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
म्हणून या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईपर्यंत या रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून भरण्याची मागणी केली जात आहे. कारण या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली तरी या रस्त्यावर कायमस्वरुपी वाहनांची वर्दळ सुरु रहाणार आहे.