पाचोरा, पहुर राज्य मार्गाचे रुंदीकरण करतांना वृक्षांचे जतन करण्यासाठी ॲड. कालिदास गिरी यांचे मा. जिल्हाधिकाऱ्यांना साकडे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०२/२०२५
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर पाचोरा ते पहुर दरम्यान रस्त्याचे रुंदीकरणाचे कामाला सुरुवात करण्यात आली असून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम दक्षिण भारतातील एका कंपनीला देण्यात आले आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असून या रस्त्याचे मोजमाप करुन या रस्त्याच्या मध्यापासून दोघ बाजूला आठ मीटर लांबी पर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे.
हे रुंदीकरण करतांना रस्त्याच्या दुतर्फा आठ मीटर अंतरावर असलेले अडथळे दूर करण्यासाठी या आठ मीटरच्या क्षेत्रात येणारे अतिक्रमण व वर्षानुवर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेला मोठ, मोठ्या झाडांची कत्तल केली जाणार असल्याचे बोलले जात असून ही वृक्षतोड करतांना या रस्त्यावर असलेल्या वळणदार रस्त्यावर काही झाडे विनाकारण कापली जाणार आहेत.
परंतु संबंधित ठेकेदाराने झाडाची मोजदाद करतांना नियमानुसार मोजदाद केली नसल्याचे मत पाचोरा येथील कायदेतज्ञ ॲड. कैलास गिरी यांनी व्यक्त केले असून वृक्षांची विनापरवाना व विनाकारण होणारी कत्तल थांबवण्यासाठी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे विनंती अर्ज दाखल केला असल्याची माहिती ॲड. कालिदास गिरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
तसेच पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्यावर असलेल्या अंबे वडगाव येथून शेंदुर्णी रस्त्यावर राखीव जंगल परिसरात तसेच पाचोरा ते वरखेडी रस्त्यावरील सत्संग भवन, वरखेडी गुरांचा बाजार व संपूर्ण रस्त्यावर अर्जुन, चिंच, साल, हिरडा, बेहडा, निंब, अशी पुरातन मोठमोठे वृक्ष असून हे वृक्ष जास्तीत, जास्त प्रमाणात वाचवण्यासाठी प्रयत्न केला जावा अशी मागणी केली आहे.
तसेच ही झाडे काढतांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले जावेत, झाडे कापताना मोजदाद झालेली झाडेच कापण्यात यावी, अतिरिक्त झडे कापली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, तसेच ठरलेल्या अटी, शर्ती व करारानुसार संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा झाडांची लागवड करुन ती जोपासली जावी अशा आशयाचे निवेदन कायदेतज्ञ ॲड. कालिदास गिरी यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे.