आले पोलीसांच्या मना तेथे कोणाचे चालेना, पाचोरा शहरासह तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करणार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०२/२०२५
पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यातील खेड्यापाड्यात सट्टा, पत्ता, जुगार, चक्री ऑनलाईन जुगार, गावठी दारुची अवैध निर्मिती व विक्री, गांजा, ताडीची विक्री तसेच देशी दारुची पानटपरी, किराणा दुकान व गल्लीबोळात विक्री हे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. या अवैध धंद्यांमुळे अल्पवयीन मुलांसह लहान, थोर व्यसनाच्या आहारी जाऊन दररोज हजारो कुटुंबे उध्वस्त होत आहेत.
ही बाब लक्षात घेऊन मागील काही दिवसांआधी पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सुदामा रेसिडेन्सी येथील कारखानदारी व त्याच्या नावाखाली सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी संबंधित विभागाला आठ दिवसाचा कालावधी दिला आहे. तसेच पाचोरा पोलीस प्रशासनाने आता अवैध धंदे बंद करण्यासाठी कंबर कसली असून दिनांक ३० जानेवारी २०२५ गुरुवर रोजी दुपारी साडेचार वाजता सारोळा रस्त्यालगत असलेल्या विट भट्टीच्या आडोशाला धाड टाकून झन्ना, मन्ना नावाच्या जुगाराचा अड्डा उध्वस्त केला करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत घटनास्थळी धाड टाकली असता त्याठिकाणी झन्ना, मन्ना जुगार खेळतांना काही इसम दिसून आले पोलीसांना पाहून काहींनी पळ काढला मात्र चार जुगारींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून संबंधितांकडून त्यांच्याकडून १४५०/०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्यासह मौल्यवान वस्तू मिळाली असून पंचनामा करुन त्या ताब्यात घेऊन संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार ॲक्ट कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील कारवाई पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तुषार संतोष विसपुते हे करीत असून या कारवाईमुळे अवैध धंदे करणारांच्या पायाखालची वाळू सरकली असून सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गातून समाधान व्यक्त करत पोलीसांचे आभार मानले जात असले तरी पोलीसांनी अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई करण्यात सातत्य ठेऊन या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.