कर्जमाफीचा निर्णय कधी ? शेतकरीवर्ग द्विधा मनस्थिती, बॅंकांची वसुली थंडावली .

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०१/२०२५
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत आम्ही निवडून आलो तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ असे आश्वासन भारतीय जनता पक्ष व शिंदे गटातर्फे देण्यात आले होते. व आता महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष, शिंदे गट शिवसेना व अजितदादा पवार राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आहे. निवडणूका झाल्या, सगळेच आपापल्या पदावर विराजमान झाले दररोज नवनवीन निर्णय घेण्यात येत आहेत परंतु निवडणूक काळात आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असा जो जाहिरनामा रेटून धरला त्याबाबत अद्यापही निर्णय जाहीर केला गेला नसल्याने शेतकरी वर्ग व्दिधा मनस्थितीत आहे.
यामागील कारण म्हणजे शेतकऱ्यांनी जुन महिन्यांपासून तर आजपर्यंत शेतात राब, राब, राबून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत नैसर्गिक संकटावर मात करुन जेमतेम शेतीमाल पिकवला आहे. शेती करतांना शेती मशागत, बी, बियाणे, खते, कीटकनाशके, रोजंदारीचा खर्च, उपाशीपोटी राहुन स्वताची रात्रंदिवस केलेली मेहनत अशा सगळ्या खर्चाची बेरीज, वजाबाकी तसेच शेतात पिकविलेला कापूस, तूर, मका व शेतीमालाला बाजारपेठत योग्य भाव नसल्याने हातात आलेली तुटपुंजी रक्कम याचा ताळमेळ बसत नसल्याने संसाराचा गाडा ओढता, ओढता मेटाकुटीला आलेला शेतकरी पिक कर्ज कधी माफ होईल या प्रतिक्षेत बसला असून काहींनी या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची हिंमत नसल्याने आत्महत्या करुन स्वताची सुटका करुन घेतली आहे.
तसेच एका बाजूला बॅंका, विविध सहकारी संस्थेमार्फत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याइतपत शेतकरी सक्षम नसल्याने निवडणूक काळात कर्जमाफी करण्यात येइल असे आश्वासन देणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारने अद्यापही आपली भुमिका स्पष्ट केली नसल्याने घेतलेल्या कर्जावरील व्याज दिवसेंदिवस वाढत चालले असून शेतकऱ्यांच्या डोक्यावर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.
*****************************************************
शेतकरी व्दिधा मनस्थितीत.
*****************************************************
पुढील वर्षासाठी कर्ज उपलब्ध करुन घेण्यासाठी मागील वर्षी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे मात्र डबघाईत सापडलेला शेतकरी इच्छा असूनही कर्जफेड करु शकत नाही. असे असले तरी ज्या, ज्या बॅंका व सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे त्यांनी आता मार्च महिन्याच्या अगोदर कर्ज वसुली करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ करुन घेतलेल्या कर्जाची मुद्दल म्हणजे मुळ रक्कम तरी भरा असे आवाहन बॅंका मार्फत करण्यात आले आहे. मात्र जे शेतकरी फक्त घेतलेल्या कर्जाची रक्कम परत करतील व व्याजाची रक्कम भरणार नाहीत त्यांना बॅंका परत कर्ज देणार नसल्याचे सांगितले जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
कर्जमाफीची घोषणा हवेतच राहिली तर शेतकऱ्यांसाठी सर्व दरवाजे बंद होणार असून भविष्यात शेती कशी करावी या विवंचनेत शेतकरी सरकारच्या भूमिकेकडे डोळे लावून बसला आहे.