खडकदेवळा खुर्द शिवारात दोन बोकड, एक शेळी व कोंबड्यावर ताव मारुन जंगली प्राण्यांनी केली अमावस्या साजरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०१/२०२५
आपल्याकडे गटारी अमावस्या साजरी करण्याची एक खुळी रुढी, परंपरा असून या गटारी अमावस्येला दारु, मटनावर ताव मारुन साजरी केली जाते. याचेच अणुकरण केल्यासारखा असाच काहीसा प्रकार आज पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील राजू तानाजी कोळी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये घडला असून याठिकाणी बिबट्याने दोन बोकड, एक शेळी व विस कोंबड्याचा फडशा पाडला असल्याची माहिती समोर येत आहे.
ही घटना घडल्यानंतर संबंधित शेतकरी व ग्रामस्थांनी पाचोरा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली होती. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खडकदेवळा येथील राजू कोळी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून याठिकाणी दोन बोकड, एक शेळी व वीस कोंबड्यांचा फडशा पाडला असल्याचे दिसून आले.
*****************************************************
वनविभागाचे अधिकारी यांचा खुलासा.
*****************************************************
घटनास्थळी गेल्यावर प्रथमदर्थी पाहता दोन बोकड, एक शेळी व वीस कोंबड्यांचा फडशा पाडला असल्याचे दिसून येत असले तरी हा बिबट्याचा हल्ला नसून कोल्हा, लांडगा, तडस अशा प्राण्यांनी हल्ला केला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कारण बिबट्या एकाचवेळी इतक्या प्राण्यांवर हल्ला करत नाही. म्हणून हा घडलेला प्रकार लांडगा किंवा कोल्ह्या सारख्या जंगली प्राण्याने केला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.
खडकदेवळा परिसरात मागील महिन्यात २५ तारखेला अशीच घटना घडली होती. तेव्हाही वनविभागाचे अधिकारी आले व आश्वासन देऊन गेले परंतु काहीच उपाययोजना केल्या नसल्याने आज पुन्हा जंगली प्राण्यांनी अजून हे नुकसान केले आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया खडकदेवळा ग्रामस्थांनी व्यक्त केल्या असून या दोघंही घटनांमध्ये झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली असून ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी खडकदेवळा गावचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.